एकाने मित्रासोबत करून दिली मैत्रिणीची ओळख; त्याने दुसऱ्यासोबत करून दिली तिची भेट, आकर्षणानंतर...

One beaten up after leaving girlfriend in Nagpur
One beaten up after leaving girlfriend in Nagpur

नागपूर : दोन जीवलग मित्र... नेहमी सोबत राहायचे... दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम... यातून एकाने दुसऱ्या मित्राची ओळख आपल्या मैत्रिणीशी करून दिली. ती त्याचीही चांगली मैत्रीण झाली. त्यामुळे दोघेही तिला सोभतच भेटत असायचे. दरम्यान, दुसऱ्या मित्राने आपल्या अन्य एका मित्रासोबत मैत्रिणीची ओळख करून दिली. काही दिवसांनी ती त्याच्याकडे आकर्षित झाली. यामुळे ती आपल्या पहिल्या मित्राकडे दुर्लक्ष करू लागली. यामुळे पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इरफान शेख रहमान (वय 27, रा. शांतीनगर) आणि विजय चव्हाण (वय 28, रा. शांतीनगर) हे दोघे जीवलग मित्र. दोघेही सोबतच राहायचे. यातूनच वीजयने आपल्या एका मैत्रिणीची ओळख इरफानसोबत करून दिली. तिघांचीही एकमेकांसोबत चांगली ओळख झाली. यामुळे विजय व इरफान सोबतच मैत्रिणीला भेटायला जात होते.

काही दिवसांनी इरफानने आपल्या एका मित्रासोबत मैत्रिणीची ओळख करून दिली. विजय आणि इरफानची मैत्रीण तिसऱ्या मित्राकडे आकर्षित झाली. ती त्याच्यावर एकतर्फी प्रेम करू लागली. यामुळे तिने विजयकडे दुर्लक्ष करणे सुरू केले. आपली मैत्रीण दुसऱ्याकडे आकर्षित झाल्यामुळे विजय चांगलाच चिडला होता. 

गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इरफान हा ताजबाग परिसरात राहणाऱ्या इमरान नावाच्या मित्रासोबत सेवासदन चौक, सारडा बिल्डिंगजवळ गप्पा मारत बसला होता. यावेळी विजय चव्हाण, शेख आरीफ ऊर्फ पहेलवान (वय 29), पहेलवानचा चुलतभाऊ शिबू शेख आणि अयान हे चौघे जण दोन मोपेडवरून तिथे पोहोचले.

त्यांनी इरफानला चाकूचा धाक दाखवून मारहाण सुरू केली. तसेच ठार मारण्याची धमकी देत गाडीवर बसवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरविले. सुनसान जागेवर पोहोचताच इरफानला मारहाण करायचे. इरफानजवळील मोबाईल हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. 

दोघांनी केली अटक

चौघांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून पळ काढल्याची तक्रार इरफानने गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी जलदगतीने तपासचक्र फिरवित दोन आरोपींना हुडकून काढत अटक केली. शिबूसह एक आरोपी फरार झाला.

शिबू हा कुख्यात गुन्हेगार

मित्राला मैत्रीण सोडून गेल्याने चौघांनी एकाला बेदम मारहाण केली. तसेच त्याला गाडीवर बसवून फिरवले आणि मारहरण केली. त्याचा मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. चार आरोपींपैकी शिबू हा कुख्यात गुन्हेगार आहे. यामुळे मारहाण झालेला युवक चांगलाच घावरला आहे. मैत्रीण सोडून गेल्याच्या रागातून हा घटनाक्रम घडल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 

ऑटोतून जाणारा मद्यसाठा हस्तगत

बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी कारवाई करीत ऑटोतून अवैध मद्यसाठा वाहून नेणाऱ्या दोघांना अटक केली. ऑटोतून पाच हजार रुपये किमतीच्या 96 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. रवी ईश्वर उफाडे (30) व दीपक प्रल्हाद गजभिये (47) दोन्ही रा. राहटेनगर टोली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बेलतरोडी ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विकास मनपिया हे गस्तीवर करीत असताना आरोपी ऑटोतून मद्यसाठा नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ऑटोचालकासह दोघांना ताब्यात घेतले. ऑटोत देशीदारूच्या 96 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी मध्यसाठा व ऑटो असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com