पाणीकर थकबाकीदारांनाही नको 'अभय', केवळ १९ हजार नागरिकांनी घेतला लाभ

राजेश प्रायकर
Sunday, 17 January 2021

महापालिकेने थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसूल करण्यासाठी नागरिकांना दंडाची रक्कम माफ करून मूळ रक्कम भरण्याची संधी देण्यासाठी अभय योजना सुरू केली.

नागपूर : शहरात २.५७ लाख पाणी ग्राहकांकडे २१२.६७ कोटी रुपये थकीत आहेत. आतापर्यंत केवळ १८ हजार ९८२ थकबाकीदारांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना २१ जानेवारीपर्यंत असून निम्मे नागरिकही योजनेच्या लाभासाठी फिरकले नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

महापालिकेने थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसूल करण्यासाठी नागरिकांना दंडाची रक्कम माफ करून मूळ रक्कम भरण्याची संधी देण्यासाठी अभय योजना सुरू केली. २१ डिसेंबर ते २१ जानेवारीदरम्यान पाणीबिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान ७० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. परंतु, थकबाकीदार या योजनेचा लाभ घेण्यासाठीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शहरात ३ लाख ७२ हजार पाणी ग्राहक आहेत. यापैकी २ लाख ५७ हजार ग्राहकांकडे २१२ कोटी ६७ लाख रुपये थकीत आहे. योजनेला एक महिना पूर्ण होत आहे. परंतु, आतापर्यंत केवळ १८ हजार ९८२ थकबाकीदारांनी ६ कोटी ८३ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत टाकले. नागरिकांना थकीत रक्कम भरण्यासाठी १० झोनमध्ये २२ देयके भरणा केंद्र सुरू केले आहे. आठवड्यातील सर्व कामाच्या दिवशी सकाळी ८ ते ४ किंवा काही ठिकाणी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भरणा केंद्र सरू आहेत. एवढेच नव्हे तर नागरिकांना मोबाईलवरूनही पेटीएमद्वारे थकबाकी भरण्याची संधी आहे. तरीही या योजनेला अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. 

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

रविवारीही देयके भरणा केंद्र सुरू -
योजनेला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादामुळे आता रविवारीही देयके भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. झोन कार्यालयातील देयके भरणा केंद्रावर नागरिकांना थकीत रक्कम भरता येणार आहे. थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी १८००२६६९८९९ या क्रमांकावरही कॉल करता येणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 19 thousand people took benefits of abhay scheme in nagpur