मेयोत अवघे ३५ कोरोनाबाधित, २४ तासांत  १२ मृत्यू; ३४२ नवे रुग्ण 

केवल जीवनतारे
Wednesday, 28 October 2020

जिल्ह्यातील मेयो, मेडिकल, एम्ससहित १०४ कोविड हॉस्पिटलमध्ये महिनाभरापूर्वी साडेपाच हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र अवघ्या २५ दिवसांमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची १५५७  वर आली.

नागपूर  : उपराजधानीत मेडिकलमध्ये २४७ तर मेयोत अवघ्या ३५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात बुधवारी १२ जण दगावले असून ३४२ बाधितांची भर पडली आहे.

जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरोनाचा उद्रेक झाला होता. मात्र आता कोरोना बाधितांचे संक्रमण कमी झाले आहे. जिल्ह्यातील मेयो, मेडिकल, एम्ससहित १०४ कोविड हॉस्पिटलमध्ये महिनाभरापूर्वी साडेपाच हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र अवघ्या २५ दिवसांमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या अवघी १५५७ शिल्लक आहे. तर गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या ३ हजार १७० आहे. 

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास
 

महिनाभरापूर्वी मेयोत ४०० रुग्णांवर उपचार सुरू होते. तर मेडिकलमध्ये ६०० वर रुग्णांवर उपचार सुरू होते. त्या तुलनेत मेयोतील रुग्णसंख्या अवघी ३५ वर आली आहे. यानंतरही मेयोकडे रुग्णांना रेफर करण्यापेक्षा मेडिकलमध्येच दाखल करण्यात येत आहे. बुधवारी नागपूर जिल्ह्यात दगावलेल्या रुग्णांत शहरातील ६ तर तालुक्यातील गावखेड्यातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

आजपर्यंत ३ हजार ९७ जण कोरोनाने दगावले आहेत. आज ३४२ नवीन कोरोनाबाधितांमध्ये शहरातील २१३, ग्रामीणचे १२६, जिल्हाबाहेरील ३ कोरोनाबाधितांची समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ५७५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात बुधवारी ५ हजार ४६४ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून यातील ३४२ जण बाधित आढळले आहेत. मागील आठ महिन्यांत ६ लाख १७ हजार ७८४ चाचण्यांची नोंद झाली आहे. कोरोनामुक्तीचा दर ९१.७३ टक्क्यांवर पोहचला आहे. बुधवारी ४५८ जणांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ८६ हजार ७५१ जणांनी कोरोनामुक्तंची नोंद झाली आहे.

ग्रामीण भागात कोरोनामुक्त अधिक

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १८५ आहे. तर ग्रामीण भागातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २७३ आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाबत योग्य काळजी घेत असल्याचे पुढे आले आहे. 

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 35 corona patients at Mayo Hospital