पदवीधर निवडणूक : प्रचारासाठी पाच व्यक्तींनाच परवानगी; कोरोनामुळे सभांवर येणार बंधन

राजेश चरपे 
Friday, 20 November 2020

विभागातील सर्वाधिक १ लाख १६ हजार मतदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. मतदान केंद्रावर पेन व मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जाताना पेन व मोबाईल नेऊ नये, ते बाहेर काढून ठेवावे लागतील

नागपूर : विधान परिषदच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघ निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. या निवडणुकीवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचे निकषानुसारच सभांना मंजुरी देण्यात येणार असून पायदळ प्रचारासाठी फक्त पाचच व्यक्तींना सोबत राहता असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट करीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

विभागातील सर्वाधिक १ लाख १६ हजार मतदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. मतदान केंद्रावर पेन व मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जाताना पेन व मोबाईल नेऊ नये, ते बाहेर काढून ठेवावे लागतील. मतदान केंद्रातील अधिकारी जो पेन देतील त्याचाच वापर करणे बंधनकारक आहे. तसेच मतदान करताना पसंतीक्रम लिहायचा आहे. तो पसंतीक्रम आकड्यातच लिहणे बंधनकारक आहे. तेही एक आकडा मराठीत एक इंग्रजीत एक रोमन असे चालणार नाही. कोणत्याही एकाच भाषेत आकडा आवश्यक असल्याचे असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

पोस्टल बॅलेटचा फॉर्म घरपोच

नागपूर जिल्ह्यात जवळपाास २०० मतदार असे आहेत, ज्यांचे वय हे ८० वर्षापेक्षा अधिक आहेत. तसेच दिव्यांग मतदांरांची यादी तयार केली जात आहे. या मतदारांना मतदान करण्यासाठी कुठलीही अडचण जाऊन नये म्हणून त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करून देण्यात येत आहे. ज्या कुणाला पोस्टल बॅलेटने मतदान करायचे आहे, त्यांनी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. हा फॉर्म प्रशासनातर्फे सर्व संबंधित मतदारांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फॉर्मसोबतच शपथपत्र जोडणेही आवश्यक आहे. याचीही व्यवस्था घरपोच केली जाईल. यासाठी नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्या बीएलओवर कारवाई

दिव्यांग व ८० वर्षावरील मतदारांपर्यंत अर्ज पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित बीएलओवर सेपवण्यात आली आहे. प्रत्येक निवडणुकीदरम्यान बीएलओ व्यवस्थित काम करीत नाही, अशी तक्रार असते. यावेळी बीएलओवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. काम न करणाऱ्या बीएलओवर कारवाई केली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी

आचारसंहिता भंगाबाबतच्या दोन्ही तक्रारी आतापर्यंत आल्या. यातील एक तक्रार सायबर सेलकडे पाठविण्यात आली. दुसरी तक्रार महापौर संदीप जोशी संदर्भातील आहे. त्याची तपासणी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जाणून घ्या - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

झोनस्तरावर व्यवस्था

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी झोन स्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 5 people allowed for campaign in graduate constituency election