ऐका हो ऐका! सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी खरोखरच ठरली वरदान

अनिल पवार
Saturday, 23 January 2021

कृषी सहाय्यक शिल्पा सुके यांच्या मार्गदर्शनावर प्रभावित होऊन खापरी कुरडकर तालुका उमरेड येथील शेतकरी दुधाराम नामदेव बकाल व माधुरी दुधाराम बकाल यांनी ५ हेक्टर जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास तयार झाले.

चांपा (जि. नागपूर) : कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार चांपा, खापरी कुरडकर येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करून पीक घेतले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले.

शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध कीटकनाशक औषधांचा वापर करतात. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत खालावत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. याबाबींवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ करण्यासाठी सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी उमरेड संजय वाकडे यांनी केले.

जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

दिवसेंदिवस शेतीस लागणाऱ्या रासायनिक खतांवरील खर्च वाढत असून रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीची पोत बिघडली. पाणी दूषित झाले, तर वातावरणावर त्याचे विपरित परिणाम होत आहेत. उत्पादित शेतमाल विषयुक्त निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यावर ‘रामबाण उपाय’ म्हणजे सेंद्रिय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व, फायदे सेंद्रिय अन्नधान्याची मागणी, रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम विशद केले.

यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचीसुद्धा माहिती कृषी सहाय्यक शिल्पा सुके यांनी शेतकऱ्यांना दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दशपर्णी अर्क, अमृतपाणी, जीवामृत, बिजामृत कसे तयार करायचे ते प्रशिक्षणार्थ्यांना करुन दाखविले. सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात दर्जेदार उत्पादन देणारी असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक शिल्पा सुके यांच्या मार्गदर्शनावर प्रभावित होऊन खापरी कुरडकर तालुका उमरेड येथील शेतकरी दुधाराम नामदेव बकाल व माधुरी दुधाराम बकाल यांनी ५ हेक्टर जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास तयार झाले.

नक्की वाचा - गृहमंत्र्यांकडून पोलिस भरतीचा संभ्रम दूर; दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी नंतरच लेखी परीक्षा

याअगोदर रासायनिक औषधींचा वापर जास्त केल्यामुळे त्यांच्या जमिनीची पोत खालावली होती. नंतर त्यांनी गायी, शेळीचे मूत्र, निंबाचा पालााचोळा, निंबोळीपासून स्वतः घरी तयार केलेल्या दशपर्णी अर्काचा वापर करून हरभरा, गहू , तूर व भाजीपाला या पिकावर फवारणी केली. त्यांना त्याचे परिणाम चांगले मिळाले. त्यांना उत्पादनही चांगले होईल., अशी त्यांना खात्री आहे. या शेतकऱ्यांनी याचे श्रेय कृषी सहायक शिल्पा सुके यांना दिले. त्यांच्या मार्गदर्शनातूनच हे घडले, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organic farming has really been a boon for farmers