भूषणावह बाब : ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी मेडिकलमध्ये

Oxford vaccine trial in medical
Oxford vaccine trial in medical

नागपूर : कोविडच्या नियंत्रणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीची क्‍लिनिकल ट्रायल जगभरासह भारतातही सुरू झाली आहे. देशात १७ केंद्रांवर ही चाचणी होणार आहे. यात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) समावेश आहे. १७ केंद्रांतून १,६०० नागरिकांवर चाचणी होत आहे.

मेडिकलमध्ये ६० ते शंभर सुदृढ व्यक्तींना ही लस टोचण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू होईल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या लसीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुण्यातील एका कंपनीला लस तयार करण्यास सरकारची मान्यता मिळाली; पण केवळ भविष्यातील वापरासाठी. कोविशिल्ड ही लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.

या लसीची क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात असून सरकारची मंजुरी मिळेल तेव्हाच ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारतातील १७ केंद्रांवर सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक्षमतांची मानवी चाचणी करण्यास परवानगी मिळाली असून, त्यात मेडिकलचा समावेश आहे.

या निकषांवर ही लस यशस्वी ठरणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलची जबाबदारी मेडिकलमधील निरीक्षक म्हणून पल्मोनरी क्रिटिकल केअर मेडिसिनचे विभागप्रमुख आणि कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार ही लस माकडांवर पूर्णपणे यशस्वी ठरली. त्यांच्यात कोविडविरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाली. यानंतर माणसावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारत, ब्राझीलसह जगातील अन्य देशांमध्ये चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. भारतामध्ये दिल्लीतील एम्स, मुंबईतील केईम तसेच पुण्यातही चाचणी सुरू झाली आहे.

अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात मेडिकलमधील मानवी चाचणी करणाऱ्या वैद्यकीय पथकात मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. शिल्पा गुप्ता, डॉ. सुशांत मुळे, डॉ. रवी यादव, डॉ. एलिना ॲलेक्झांडर यांचा समावेश आहे.

संशोधनासाठी मेडिकलमध्ये संधी
आयसीएमआरच्या निकषानुसार मेडिकलमध्ये लसीच्या चाचणीला सुरुवात होईल. मेडिकलमध्ये ६० ते शंभर जणांवर कोविशिल्ड लसीची चाचणी करण्यात येईल. स्थानिक समितीकडून नुकतेच मान्यता मिळाली आहे. कोविड नियंत्रणासाठी लसीच्या जागतिक स्तरावरील संशोधनासाठी मेडिकलमध्ये संधी मिळाली आहे.
- डॉ. सुशांत मेश्राम,
विभागप्रमुख, पल्मोनरी क्रिटिकल केअर मेडिसीन, मेडिकल-सुपर, नागपूर

ही मेडिकलसाठी भूषणावह बाब
भारत सरकारने निवड केली ही मेडिकलसाठी भूषणावह बाब आहे. आठ दिवसांपूर्वी प्राधान्य परवाना मिळाला आहे. यानंतर आम्ही चाचणीची प्रक्रिया प्रोटोकॉलनुसार करण्यासाठी तयारी केली आहे. चाचणीचा पहिला डोस देण्यास दोन दिवसांनंतर सुरुवात होईल. मेडिकलमध्ये डॉ. सुशांत मेश्राम यांच्या वैद्यकीय पथकाच्या परिश्रमातून चाचणीचा टप्पा यशस्वी होईल.
- डॉ. सजल मित्रा,
अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com