लालपरीला उत्तम प्रतिसाद; दिवसाला ८७ फेऱ्या, तर जिल्हाबाह्य एसटी सुरू

मनोहर घोळसे
Tuesday, 20 October 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एसटी सेवा बंद केली होती. १३३ दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोबतच एसटीचे आर्थिक कंबरडे मोडल्याने सावनेर आगारालाही चांगलाच फटका बसला होता.

सावनेर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑगस्ट महिन्यात एसटीची सेवा सुरू केली. सुरुवातीला काही दिवस एसटीला प्रवासीच मिळत नव्हते. त्यामुळे दोन-तीन प्रवासी घेऊन एसटी धावत होती. मात्र, आता हळूहळू एसटीला चांगले दिवस येत असून प्रशासनाने बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सध्या आंतरजिल्हा व बाह्यजिल्हा अशा दिवसाला ८७ फेऱ्या सुरू आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एसटी सेवा बंद केली होती. १३३ दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोबतच एसटीचे आर्थिक कंबरडे मोडल्याने सावनेर आगारालाही चांगलाच फटका बसला होता. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले होते. अशातच शासनाने एसटीचे अर्थकारण सावरण्यासाठी ग्राहकांना सवलतीच्या दराने मालवाहतुकीसाठी परवानगी दिली. त्यानंतर आंतरजिल्हा बस सेवा व ऑगस्ट महिन्यापासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीला मुभा दिल्याने एसटी कर्मचारी व प्रवासी आनंदी झाले आहेत. 

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ

सावनेर आगारात हळूहळू का होईना पण दिवसेंदिवस प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे एसटीच्या बसफेऱ्या वाढत असून सध्याच्या घडीला दिवसाला ८७ फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांमध्ये नागपूर, तिष्टी, काटोल, कळमेश्वर, रामटेक, नांदा, सावरगाव, गडचिरोली, वर्धा, अहेरी, पुलगाव तिष्टीमार्गे अमरावती आणि नागपूरमार्गे अमरावती आदी मार्गांचा समावेश आहे. यापुढेही बसफेऱ्या वाढविण्याचे नियोजन एसटीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. साहजिकच एसटीची सेवा विश्वासार्ह असल्याने कोरोना काळातही अल्पावधीतच एसटीच्या सेवेला प्रतिसाद मिळत आहे. एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी एसटीची मालवाहतूक सेवा व प्रवासी वाहतूक पूर्ववत होऊन नक्कीच संजीवनी ठरेल, असा विश्वास येथील एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, बस फेऱ्यांची वाढती संख्या बघून सावनेर आगारातील लालपरीला सुगीचे दिवस येताना दिसत आहे. 

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

ग्रामीण भागातील प्रवाशांचा ३० टक्के प्रतिसाद - 
राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य खबरदारी घेऊन बससेवा सुरू आहे. बसला सॅनिटाईज केले येते. सध्या ग्रामीण भागातील प्रवाशांचा 30 टक्के, तर शहरी भागातील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास बसफेऱ्या वाढवण्यात येईल. प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक राकेश रामटेके व वाहतूक निरीक्षक चैताली अढाऊ यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passengers better give response to ST bus in saoner