अरे हे काय... नागपुरात पुन्हा जनता कर्फ्यू, कोण करतयं ही मागणी

राजेश प्रायकर
Monday, 31 August 2020

खाजगी रुग्णालयांकडून होणारी लूट, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी समाजभवनाचा वापर, चाचणी केंद्रात वाढ, चाचणी झाल्यानंतर ओपीडी आणि समुपदेशनाची व्यवस्था, दक्षिण व पूर्व मतदारसंघात आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था करणे आदीकडे आमदारांनी लक्ष वेधले. गांधीबाग झोनमध्ये शववाहिकेची उपलब्धता याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधन्यात आले.

नागपूर : नागपुरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक आठवड्यातील शनिवार आणि रविवारी ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन करण्यात यावे, दुकानांबाबत सम-विषम तारखांचा नियम नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या मार्गावर शिथील करण्यात यावा, अशी मागणी आज शहरातील आमदार, नगरसेवकांनी केली. महापौर संदीप जोशी यांनी याबाबत प्रशासनाला विचारपूर्वक निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नागपूरकरांना कुटुंबीयांसोबत घरातच विकेंड साजरा करण्याची संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

कोव्हिडसंदर्भातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेत अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती पिंंटू झलके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन, सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते. 

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

 

यावेळी आरोग्य विभागातील त्रुटींवर आमदारांनी नाराजी व्यक्त केली. खाजगी रुग्णालयांकडून होणारी लूट, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी समाजभवनाचा वापर, चाचणी केंद्रात वाढ, चाचणी झाल्यानंतर ओपीडी आणि समुपदेशनाची व्यवस्था, दक्षिण व पूर्व मतदारसंघात आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था करणे आदीकडे आमदारांनी लक्ष वेधले. गांधीबाग झोनमध्ये शववाहिकेची उपलब्धता याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधन्यात आले. आमदारांनी व मनपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आयुक्त राधाकृष्णन यांनी सांगितले.

आणखी १६ चाचणी केंद्र सुरू करणार

सध्या ३४ कोरोना चाचणी केंद्र असून लवकरच नव्याने १६ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर किमान १०० चाचण्या होतील, यादृष्टीने प्रयत्न असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.

 

खाजगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलाचे ऑडिट

खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिलाची आकारणी करणे अपेक्षित आहे. अधिक पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्यास रुग्णांच्या बिलांचे थर्ड पार्टी ऑडीट करावे, असे निर्देश महापौर जोशी यांनी प्रशासनाला दिले.

 

बेडस्‌साठी केंद्रीय कॉल सेंटर

पॉझिटिव्ह आल्यानंतर कुठे जावे, कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, याबाबत रुग्णांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महापालिकेने केंद्रीय कॉल सेंटरर सुरू केले. ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर नागरिकांनी फोन केल्यास त्यांना बेड्‌सची उपलब्धता, खासगी रुग्णालयातील दर आदी माहिती उपलब्ध होईल. 

संपादित ः अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People's representatives demand public curfew in Nagpur