esakal | जिल्हा संघटनेसह खेळाडूंचाही लागणार कस; कोरोनामुळे अॅथलेटिक्स स्पर्धा निर्धारित वेळेत घेण्याचे मोठे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

 The players along with the district association will face problems

महासंघाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी जिल्हा, राज्य व पश्चिम विभागीय स्पर्धा होणे आवश्यक आहे. 

जिल्हा संघटनेसह खेळाडूंचाही लागणार कस; कोरोनामुळे अॅथलेटिक्स स्पर्धा निर्धारित वेळेत घेण्याचे मोठे आव्हान

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर: भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने कॅलेंडर घोषित केल्यानंतर आता नागपुरातही मैदानी स्पर्धांची तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचे वर्तमान संकट, व्यस्त कार्यक्रम आणि वेळेच्या कमतरतेमुळे नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेसह खेळाडूंचाही चांगलाच कस लागणार आहे.

महासंघाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी जिल्हा, राज्य व पश्चिम विभागीय स्पर्धा होणे आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रीय स्पर्धेची तारीख घोषित झाल्यामुळे आता आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिल्हा ज्युनिअर स्पर्धा नोव्हेंबरच्या सुरुवातीला घेणे आवश्यक आहे. मात्र सध्याची स्थिती उत्साहवर्धक नाही. कारण कोरोनामुळे अजूनही आऊटडोअर स्पोर्ट्सला परवानगी मिळाली नाही. 

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

३० ऑक्टोबरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. या स्थितीत निर्धारित वेळेत स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चितच मोठे आव्हान राहणार आहे. आमची तयारी आहे, पण त्याचवेळी स्थानिक प्रशासनाकडूनही हिरवी झेंडी मिळणे आवश्यक राहणार आहे. आम्ही आयुक्तांकडे तशी परवाणगीही मागितलेली आहे. कोकण वगळता राज्यात सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात नागपूरसारखीच परिस्थिती आहे. कोरोनामुळे मुंबई, पुण्यासह इतरही जिल्हा संघटनांना स्पर्धा घेताना अडचणी जात आहेत.

स्पर्धेपूर्वी झालेल्या बैठकीत निवड चाचणी किंवा निवडक एलिट खेळाडूंसह स्पर्धा आयोजित करण्याचाही विचार पुढे आला होता. मात्र त्यामुळे अन्य खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो. कारण ते वर्षभरापासून स्पर्धेची वाट पाहात असतात. या स्पर्धेवर त्यांचे पुढचे भवितव्य व क्रीडा गुणही अवलंबून असतात. अशावेळी त्यांना पुरेशी संधी मिळणे गरजेचे आहे. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ज्युनिअर खेळाडूंनाच गुण मिळतात. 

स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर

खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर सहभाग संघटनेपुढे आणखी एक आव्हान राहणार आहे. इतक्या खेळाडूंना एका ठिकाणी एकत्र करणे आणि सर्व इव्हेंट्स घेणे निश्चितच सोपी गोष्ट नाही. ही अडचण लक्षात घेता महासंघाने देशभरातील संघटनांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) दिलेली आहे. त्यानुसार एका ठिकाणी एकच इव्हेंट आयोजित करावा लागणार आहे. त्यामुळे स्पर्धेचे दिवसही वाढणार आहेत. मात्र हे सर्व प्रशासनाच्या परवाणगीवरच अवलंबून राहणार आहे.

अधिक वाचा - निष्काळजीपणाचा कळस! पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही नेले घरी; दुसऱ्या दिवशी मृत्यू होताच पत्नीविरुद्ध गुन्हा

मुलांना बाहेरगावी नेण्याची अडचण 

डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्हा स्पर्धेनंतर लगेच डेरवण येथे राज्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना कोकणात नेण्याचीही मोठी अडचण राहणार आहे. मुले लहान असल्यामुळे अनेकदा खेळाडूंसोबत त्यांचे पालकही येतात. हे सर्व मॅनेज करताना निश्चितच कस लागणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, लॉकडाउनमुळे सध्या शहरातील बहुतांश खेळाडू सरावापासून वंचित आहेत. अशावेळी त्यांच्या कामगिरीवर विपरित परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. स्पर्धा आयोजनात या सर्व अडचणी असल्या तरी, त्यावर आम्ही मात करू, असा आम्हाला विश्वास आहे.

संपादन - अथर्व महांकाळ