गृहमत्र्यांच्या बंगल्यावरील तैनात पोलिसाचा मृत्यू, गृहमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

अनिल कांबळे
Thursday, 18 February 2021

संजय हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक होते. बुधवारी रात्री मोटरसायकलने ते कर्तव्यावर हजर राहण्यासाठी घरून निघाले. नांदगाव फाटा परिसरात एमएच-४०-बीएल-७९६८ या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली.

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्समधील बंगल्यावर तैनात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास कोराडी मार्गावरील नांदगाव फाटा येथे घडली. संजय धनराज नानवरे, असे मृतकाचे नाव असून याबाबत स्वतः गृहमंत्र्यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

संजय हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक होते. बुधवारी रात्री मोटरसायकलने ते कर्तव्यावर हजर राहण्यासाठी घरून निघाले. नांदगाव फाटा परिसरात एमएच-४०-बीएल-७९६८ या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. यात संजय यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. ट्रकचालकाचा अटक करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी लावली होती.वृत्त लिहिपर्यंत पोलिस ट्रकचालकाचा शोध घेत होते.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो, शाळा-महाविद्यालयात येऊ नका! संस्थांचे...

दरम्यान, माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलिस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे, असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police died who deployed at home minister anil deshmukh bungalow in nagpur