पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाच्या मुलाचे अपहरण; अपहृत मुलाच प्रसंगावधान

योगेश बरवड
Monday, 26 October 2020

आरोपी सार्थकला गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवीत राहिले. आरोपी बेसावध असताना सार्थकने प्रसंगावधान राखत पळ काढला आणि थेट मावशीकडे गेला. घटनाक्रमाने घाबरलेल्या सार्थकच्या तोंडून बोलही फुटत नव्हते. मावशीने सार्थक घरी आल्याची माहिती आई-वडिलांना दिली आणि साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

नागपूर : उपराजधानीत सातत्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटना उघडकीस येत आहेत. निर्ढावलेल्या गुंडांची पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचेच अपहरण केले. विशेष म्हणजे चक्क पोलिस वसाहतीतून १२ वर्षीय मुलाला मारोती व्हॅनमध्ये कोंबून अपहरण करण्यात आहे. प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढल्याने मुलगा बचावला. सार्थक जावडीकर (१२) असे या मुलाचे नाव.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक इयत्ता सहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील कमलेश जावडीकर वाडी ठाण्यात नाईक पोलिस पदावर कार्यरत आहेत. ते पत्नी पल्लवी व दोन मुलांसह गिट्टीखदान हद्दीतील पोलिस लाइन टाकळी या पोलिस वसाहतीत वास्तव्यास आहेत.

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा

शुक्रवारी दुपारी सार्थक हा काही मित्रांसह पोलिस वसाहतीतील २८० गेटसमोर खेळत होता. १.२० वाजताच्या सुमारास मारोती व्हॅन वेगात आली. आत तीन तो चार आरोपी बसून होते. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपी सार्थकजवळ गेले. त्याला बळजबरीने व्हॅनमध्ये बसवून पळ काढला.

काही वेळातच आरोपींनी कमलेश यांना फोन करून मुलाच्या अपहरणाची माहिती दिली. सोबतच मुलगा सुखरूप हवा असेल तर १० लाखांच्या खंडणीची मागणी केली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. सर्वत्र आरोपींचा शोध सुरू झाला. दरम्यान, मुलाची आई पल्लवी यांच्या तक्रारीवरून अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक वाचा - एकनाथरावांना सासुरवाडीतून कोण साथ देणार?

आरोपी सार्थकला गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवीत राहिले. आरोपी बेसावध असताना सार्थकने प्रसंगावधान राखत पळ काढला आणि थेट मावशीकडे गेला. घटनाक्रमाने घाबरलेल्या सार्थकच्या तोंडून बोलही फुटत नव्हते. मावशीने सार्थक घरी आल्याची माहिती आई-वडिलांना दिली आणि साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती

अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिस आपल्याला हुडकून काढतीलच याची कल्पना होती. यामुळे ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिले. या दरम्यान वर्धा मार्गाने ते बुटीबोरीपर्यंत जाऊन आल्याचीही माहिती पुढे आली आहे. यानंतर ते गणेशपेठ बसस्थानक परिसरात गेले. याच भागातून सार्थकने पळ काढला. काहीच सुचत नसले तरी मावशीच्या इतवारीतील घराचा रस्ता त्याला आठवत होता. लपत छपतच धावत जाऊन त्याने मावशीचे घर गाठले.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

अपहरणकर्ते मोकाटच

शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सार्थक सापडला. त्यापूर्वी आणि नंतरही आरोपींचा शोध घेतला जात आहे. पण, नागपूरच्या स्मार्ट पोलिसांना आरोपींचा सुगावा लावता आला नाही. पोलिसांचे कुटुंबच सुरक्षित नसल्याचे अधोरेखित करणारी ही घटना सामान्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police kidnap son under the pretext of asking for address