पोलिसांची ‘रिवॉर्ड’ रक्कम अडकली कुठे? बाबूगिरीमुळे खोळंबा; पोलिस आयुक्तांनी दखल घेण्याची मागणी 

अनिल कांबळे 
Friday, 30 October 2020

रिवॉर्डची रक्कम अडकली कुठे? असा प्रश्‍न पोलिस कर्मचारी एकमेकांना विचारत आहेत.

नागपूर ः एखाद्या किचकट गुन्ह्याचा योग्य तपास करून छडा लावल्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तपास पथकाला बक्षीस म्हणून रोख रक्कम (रिवॉर्ड) देण्याची घोषणा केल्या जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रिवॉर्डची रक्कम पोलिस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे रिवॉर्डची रक्कम अडकली कुठे? असा प्रश्‍न पोलिस कर्मचारी एकमेकांना विचारत आहेत.

पोलिस आयुक्तालयाकडून १०० रुपयांपासून तर थेट १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम कामगिरीनुसार रिवॉर्ड म्हणून घोषित केली जाते. पोलिसांना अनेकवेळा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागते. अनेकवेळा त्यांना आपला जीव जोखीममध्येही टाकावा लागतो. कर्मचारी मोठ्या शिताफीने व बुद्धीचातुर्याने गुन्हेगारांना पकडून चांगली कामगिरी करतात. या कामाची दखल झोनचे उपायुक्त व पोलिस आयुक्त घेतात. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

अशा पोलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही रक्कम रिवॉर्ड म्हणून दिल्या जाते, तशी नोंद पोलिस आयुक्तालयात सर्विस शिटला करण्यात येते. ही नोंद नोकरीत पदोन्नती, मेडल किंवा विभाग स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी उपयोगी ठरतात. मात्र, रिवॉर्डची नोंद केवळ शीटवर केल्या जाते. 

त्या बदल्यात मिळणारी बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड होतो. अनेक वेळा सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना मिळालेला रिवार्ड हा अन्य कर्मचाऱ्यांना चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करतो. पोलिस आयुक्तांनी या बाबीला गांभीर्याने घ्यावे, जेणेकरून पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल, तसेच थोडाफार का होईना पोलिसांना आर्थिक हातभारसुद्धा लागेल,असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

महत्वाची बातमी - शेतकऱ्यांनो, हिरव्या संत्र्याला गळती आली? घाबरू नका! कृषी विभागाने पुढील उपाय करण्याचा दिला सल्ला

लालफितशाही धोरण

पोलिस आयुक्तालयात लिपिक वर्गाचे वर्चस्व आहे. कोणतेही काम वेळेवर करीत नाही. त्यांच्या हाताखाली पोलिस अंमलदार काम करीत आहेत. रिवार्ड किंवा पदकाचे प्रस्तावसुद्धा बाबू ‘चिरीमिरी’साठी अडवून ठेवतात, अशी कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज आहे. अनेक कर्मचाऱ्यांची बक्षिसाची रक्कम अडकली आहे. जर ती रक्कम दिवाळीपूर्वी मिळाल्यास सण पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police still not get their reward amount