उपराजधानीत एसपींच्या बदलीचे राजकारण; शिवसेना आणि गृहमंत्र्यांमध्ये सुरू आहे संघर्ष!

अतुल मेहेरे
Thursday, 15 October 2020

आमदार चतुर्वेदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या घडामोडींमध्ये त्यांचाही ‘रोल’ असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. सोबतच कॉंग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचे नवीन एसपी म्हणून कुणाला आणायचे, यावर स्वतंत्र मत असल्यामुळेही ओला यांची बदली रखडली असल्याचे सूत्र सांगतात.

नागपूर : राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांतील एसपींच्या बदल्या झालेल्या आहेत. मुदत उलटून गेलेल्या ज्या जिल्ह्यांमधील अधीक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा समावेश आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच जिल्ह्यातील एसपींची बदली रखडल्यामुळे यामागे काही राजकारण तर होत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या बदलीबाबत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. तर ओला यांची येथून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी येथे कुणाला आणायचे, यावर सगळा खल सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यामध्ये जिल्ह्यात कुणाला आणायचे, यावर एकमत होत नाहीये, असेही सूत्र सांगतात.

हेही वाचा - हॉटेल घेता का हॉटेल! झळकू लागले फलक

याला कारण म्हणजे सुरुवातीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवल्या होत्या. त्यानंतर बराच काळ त्या बदल्या रखडल्या. त्यामुळे पुन्हा शिवसेना आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात तर या बदलीवरून काही संघर्ष सुरू नाहीये ना, अशीही चर्चा होऊ लागली आहे.

पोलिस विभागातील बदलीवरून गृहमंत्री देशमुख आणि शिवसेना यांच्यात जर काही झाले असेल किंवा सुरू असेल, तर त्यावर विधानपरिषदेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचा नक्कीच काहीतरी प्रभाव असणार, अशीही माहिती आहे. कारण, आमदार चतुर्वेदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

त्यामुळे या घडामोडींमध्ये त्यांचाही ‘रोल’ असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. सोबतच कॉंग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचे नवीन एसपी म्हणून कुणाला आणायचे, यावर स्वतंत्र मत असल्यामुळेही ओला यांची बदली रखडली असल्याचे सूत्र सांगतात.

बदल्यांमध्येही काहीतरी राजकारण सुरू

महाराष्ट्रातील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्या एव्हाना झालेल्या आहेत. केवळ नागपूर जिल्ह्यातील बदलीच फक्त होणे बाकी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात काही बदल्यांमध्ये एकमत न झाल्यामुळे ही प्रक्रिया रखडली असल्याचेही सूत्र सांगतात. बदली सत्राच्या सुरुवातीला असाच एक अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांमध्येही काहीतरी राजकारण सुरू असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

माझा काय संबंध?
जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली ही सर्वस्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्याशी संबंधित आहे. माझा अर्थाअर्थी त्या खात्याशी तसा काही संबंध येत नाही. आमदार या नात्याने कधी कोणते काम पडले तरच एसपी साहेबांशी बोलणे किंवा भेटणे होते. त्यांची बदली व्हावी किंवा होऊ नये, हा माझा विषय नाही. त्यामुळे त्याबद्दल मी कुणाला काही सांगितलेही नाही आणि विचारलेही नाही.
- दुष्यंत चतुर्वेदी, आमदार

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics of SP replacement in the vice capital