Success Story : बेरोजगार म्हणून शहरात आला अन् दोन हजार लोकांना दिला रोजगार

दिलीप चव्हाण
Sunday, 15 November 2020

प्रमोद यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्थानिक खापर्डे विद्यालयात घेतले. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर शेती केली.

नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यातील साळवा येथील तरुण नव्वदच्या दशकात रोजगार शोधत नागपूरला आला. सतरा वर्ष मेहनत केली आणि आज स्वतःची कंपनी उभी केली. त्यांच्या मातोश्री प्रभा सिटी डेव्हलपर्स या कंपनीत आज दोन हजारांपेक्षा जास्त कामगार काम करतात. ही यशोगाथा आहे प्रमोद घरडे यांची... 

प्रमोद यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्थानिक खापर्डे विद्यालयात घेतले. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर शेती केली. कुही-साळवा मार्गावर प्रवाशांची गाडी चालविली. त्यानंतर थ्रेशर मशिनचा व्यवसाय केला. मात्र, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द मनात होती. त्यामुळे त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे ते बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या शोधात १९९३ साली दाखल झाले. वॉलकंपाऊंड बांधकामापासून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.  

हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिकता, कर्तव्यनीष्ठता, एकाग्रता व सर्वात चांगले काम (बेस्ट) करुन दाखविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोबतच आईवडिलांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून काम केले, तर नीश्चीतच प्रत्येक जन आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून मोठे होऊ शकतो, असे प्रमोद सांगतात. बांधकाम व्यवसायात दिवसरात्र काम करून सर्वात चांगला बंगला, इमारत, फ्लॅट स्कीम, रोहाऊस तयार करून ग्राहकांना संपूर्ण सुविधा देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते. याव्यतिरिक्त कोणत्याही कामात वेळ वाया घालवत नाही. वॉलकंपाऊंडच्या कामापासून अकरा मजली इमारतीचे बांधकाम केले. नागपूर शहरात झिंगाबाई टाकळी, मानकापूरपासून भरतवाड्यापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त विविध फ्लॅट उभारले. त्यातच आज त्यांच्या कंपनीत साईट काँट्रॅक्टर, सुपरवायझर, इंजिनियर, मिस्त्री, कारागिर, चालक, कारागीर, टेकनिकल वर्कर, मजूर, असे जवळपास दोन हजार सहकारी काम करतात. लॉकडाऊनच्या काळातही त्या सर्वांना सांभाळून घेतल्याचे घरडे सांगतात.

हेही वाचा - Motivation Story : सुहासने लावला ‘सेफ फूड वॉश’ लिक्विडचा शोध; भाज्या होणार...

समाजकार्य -
गेल्या वर्षी त्यांनी कुही, उमेरड, भिवापूर आणि कामठी तालुक्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण केले. तसेच कोरोना महामारीत उमरेड विधानसभा क्षेत्रातील ९ हजार गरजू लोकांना अन्न, धान्य व जीवनपयोगी साहित्य वाटप केले. नुकताच कुही तालुक्यातील राजोला सर्कलमध्ये अनेक गावे पुराच्या तडाख्यात सापडल्याने घरच उद्ध्वस्त झाले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, ताळपत्री व जीवनपयोगी साहित्य या सर्वांचे २९० किट्स मातोश्री प्रभा सेवा संस्थेच्या सौजन्याने वाटप केले. भविष्यात कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल? असा प्रकल्प कुही तालुक्यात  सुरू करण्याचा विचार असल्याचे घरडे सांगतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pramod gharde gives employment to two thousand people in nagpur