प्रीतीचा आणखी एक कारनामा उघड, उच्चशिक्षित तरुणीला दाखवली फूस आणि... 

Preeti Das cheated on a highly educated girl
Preeti Das cheated on a highly educated girl

नागपूर : बुशरा खान म्हणजेच प्रीती दासने एका उच्चशिक्षित तरुणीला नोकरी लावून देण्याच्या नावाने दीड लाख रुपयांनी गंडा घातला. पैसे परत करण्याच्या नावाखाली "लुटेरी गॅंग'मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली. मात्र, तरुणीने तिची ऑफर धुडकावून लावत पैसे बुडाल्याचे दुःख पचवून माघार घेतली. ती युवती सीताबर्डी ठाण्यात तक्रारीसाठी गेली असता प्रीती तिच्यापूर्वी ठाण्यात बसून दिसली. याउपरही एका अधिकाऱ्याने चक्‍क तिची तक्रार घेण्यास नकार दिल्याची धक्‍कादायक माहिती उजेडात आली आहे. मात्र आता ती युवती प्रीती दासविरुद्ध तक्रार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित 23 वर्षीय तरुणीला प्रीतीने जाळ्यात ओढले. तिला नोकरीचे आमिष दाखवून दीड लाख रुपये उकळले. नोकरी न मिळाल्याने तिने प्रीतीला पैसे परत मागितले. परंतु, प्रीतीने सीताबर्डी पोलिस ठाण्यात "सेटिंग' केली. त्यामुळे युवतीचा नाइलाज झाला. मात्र, सुंदर दिसणाऱ्या तरुणीला पैसे परत करण्याचे आमिष दाखवून "लुटारू गॅंग'मध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला. मात्र, प्रीतीची रंगीत कामे पाहता त्या युवतीने नकार दिला. त्या तरुणीचे आता लग्न ठरले असून, ती पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

"लुटेरी दुल्हन' प्रीती दासने गुड्डू, सुनील, अरविंद, नरेंद्र, तौफीक, इरशाद, महेश, सुदीप आणि अन्य आठ ते दहा जणांना लग्नाचे आमिष दाखवले होते. गुड्डूला तर सर्वस्व अर्पण केल्याचे घोषित केले होते. त्यामुळे गुड्डूकडून प्रीतीने फ्लॅटसह 14 लाख रुपयांची रक्‍कमही उकळली. मात्र, गुड्डूने दिलेल्या फ्लॅटवर पोलिस अधिकारी सुनीलसोबत प्रीती पार्टी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गुड्डूने तिला थेट पैसे परत मागितले. प्रीतीने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन लग्न करण्यास आणि पैसे परत करण्यास नकार दिला. 

"मेरी जेब में 66 पोलिस अधिकारी हैं' अशी धमकी देऊन प्रीतीने पोलिस अधिकाऱ्यांसमोरच गुड्डूला मारहाण केली. त्यामुळे गुड्डूने प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रीती आणि अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे "कृत्य' पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यापर्यंत पोहचले. आयुक्‍तांनी गांभीर्य दाखवून प्रीतीच्या काळ्या कर्माचा भंडाफोड केला. पोलिस आयुक्‍तांनी दखल घेतल्यानंतर लकडगंज पोलिस ठाण्याचे पीआय नरेंद्र हिवरे यांनी प्रीतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, प्रीतीला न्यायालयातून जामीन मिळावा म्हणून लकडगंज पोलिसांनी मदत केल्याची चर्चा आहे. 
 

प्रीती दासच्या आवाजाचे नमुने 

लग्नाचे आमिष दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या प्रीती दासविरुद्ध अनेक कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना सापडल्या आहेत. पाचपावली पोलिसांनी मंगळवारी प्रीतीच्या आवाजाचे नमुने घेतले व प्रादेशिक न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत पाठवले. उमेश ऊर्फ गुड्डू तिवारी यांनाही तिने अशाप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवले व 14 लाखांनी गंडवले. उमेशपासून पैसे उकळताना ती त्याला वेळोवेळी धमकी देत होती. त्या सर्व संभाषणांचे उमेशने कॉल रेकॉर्डिंग करून ठेवले. आजवर तिने विविध कारणे पुढे करून व धमकी देऊन उकळलेल्या पैशासंदर्भात संभाषण रेकॉर्ड असून, तो सबळ पुरावा आहे. त्याला न्यायालयाच्या पातळीवर सिद्ध करता यावे म्हणून पोलिसांनी मंगळवारी तिच्या आवाजाचे नमुने घेतले व प्रादेशिक न्यायसहाय्यक प्रयोगशाळेला पडताळणीसाठी पाठवले. 
 

प्रीती बनली तोतया पत्रकार 

प्रीती दासकडे प्रेसमध्ये पत्रकार असल्याचे आयकार्ड होते. ते कार्ड दाखवून ती राजकीय नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत जवळीकसाधायची. एका मोठ्या राजकीय नेत्याशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या पीएने तिला चक्‍क गाडीतून खाली उतरवले होते. त्यानंतर ती प्राजक्‍ता, शबाना, सुनीता, रेखा आणि शीतल पत्रकारासोबत मिळून "मांडवली' करायला लागली. मोठमोठ्या कार्यक्रमात या तिघीही पत्रकार सांगून मिरवत होत्या, अशीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com