एसटीच्या दारात खासगी एजंट्सचा धुमाकूळ; प्रवाशांची करतात पळवापळवी; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

private bus agents are trying attract ST bus travelers
private bus agents are trying attract ST bus travelers

नागपूर : कोरोना संकटाचा धिटाईने सामना करणाऱ्या एसटीला आता खासगी वाहतूकदारांनी उभ्या केलेल्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खासगी वाहतूकदारांचे एजंट गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सक्रिय झाले आहेत. लांबवरचे प्रवासी येताच सुखकर प्रवासाची थाप देऊन त्यांना पळविण्याचा क्रम राजरोसपणे सुरू असून त्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे.

गावांना जोडणाऱ्या लालपरीलाच प्रवाशांकडून पहिली पसंती मिळते. सुरक्षित प्रवास आणि वाजवी दराची हमी असल्याने प्रवासी एसटीवरच विश्वास टाकतात. मात्र खासगी वाहतूकदार या विश्वासाला नेहमीच तडे देण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी गणेशपेठ बसस्थानकालगतच्या जाधव चौकातून प्रवासी पळविण्याचा प्रकार नियमित चालायचा. महत प्रयत्नांनंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. .

कोरोनापश्चात पुन्हा जुनीच परिस्थिती दिसून येऊ लागली आहे. कोरोना काळात एसटीसह खासगी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. बिगीन अगेन अंतर्गत दोन्ही सेवा पुन्हा बहाल करण्यात आल्या आहेत. अलीकडे एसटीला बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहून नेण्याची परवानगी मिळाली आहे. 

शुक्रवारपासून नागपूर- पुणे सेवेचेही ‘पुनश्च हरीओम’ झाले. पण, पहिल्या दिवशी अपेक्षेनुरूप प्रवासीच मिळाले नाहीत. पण, या सेवेसंदर्भात विचारणा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या बरीच होती. खासगी वाहतूकदारांचे एजंट चौकशी केंद्राजवळच दबा धरून बसले होते. चौकशी केंद्रात विचारण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना हेरून एजंट आरामदायी प्रवासाची हमी देऊ त्यांना पळविण्याचा प्रयत्न करताना दिसले. 

एसटीचे शिवशाहीचे तिकीट चौदाशेच्या घरात असतानाच खासगी एजंट दोन हजारात एसी स्लिपर मधून सुखकर प्रवास उपलब्ध असल्याचे सांगत होते. केवळ पुणेच नाही तर मध्यप्रदेशासह लांबवरच्या अन्य ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांवरही त्यांचा डोळा होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्या देखत हा प्रकार सुरू असूनही एजेंटकडे दुर्लक्ष केले जात होते, हे विशेष.

प्रवासी पळविण्याच्या प्रक्रियेला आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळ प्रशासनासह पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरविणे आवश्यक आहे. प्रवाशांनीही स्वतःच्या सुरक्षेचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. एसटीकडून बसेसचे पूर्ण सॅनिटायझेशन केले जाते. खासगी बसमध्ये ती खात्री नाही.
-अजय हट्टेवार,
 प्रादेशिक सचिव,
एसटी कामगार संघटना.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com