कोविड लसीबाबत खासगी रुग्णालयांचा असहकार; कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

राजेश प्रायकर
Wednesday, 11 November 2020

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोविड-१९ वर नियंत्रणासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा डेटाबेस तयार करण्याचे काम महापालिका करीत आहे. 

नागपूर ः कोविडची लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती महापालिकेने खाजगी रुग्णालयांना मागितली. परंतु आतापर्यंत केवळ १८० रुग्णालयांनी माहिती दिली असून ४६० रुग्णालयांनी असहकाराची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतही खाजगी रुग्णालय गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोविड-१९ वर नियंत्रणासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा डेटाबेस तयार करण्याचे काम महापालिका करीत आहे. 

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'

ही माहिती लवकरात लवकर शासनाकडे पाठविणे बंधनकारक असून सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन महापालिकेने केले होते. शहरात ६४० रुग्णालये असून १८० रुग्णालयांनी ९५५० कर्मचाऱ्यांची माहिती महापालिकेकडे सादर केली. ४

६० रुग्णालयांनी आतापर्यंत माहिती सादर केली नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनी माहिती देणे आवश्यक आहे. 

यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना ऑक्टोबरमध्ये पत्र दिले आहे. परंतु अद्यापही खाजगी रुग्णालयांनी फारसे गांभीर्य याबाबत दाखविले नाही. त्यामुळे आरोग्य सेवेतील हजारो कर्मचारी लसीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची माहिती वेळेवर सादर न केल्यास त्यांना कोरोनाची लस मिळण्यात विलंब होऊ शकते. सर्व रुग्णालयांनी वैद्यकीय व्यावसायिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती homnmc.ngp@gmail.com या मेलवर लवकर सादर करावी. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी पॅथीचे डॉक्टरांनीही विहित नमुन्यात माहिती द्यावी.
- राम जोशी, 
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private hospitals are not agreed to give details of workers for covid vaccine