विदर्भाला रसिकाश्रय देणाऱ्या मामांची नाट्यक्षेत्रातून एक्झिट

Ram Jadhav passed away
Ram Jadhav passed away

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याने नाट्यक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाट्यवर्तुळात ते ‘मामा’ नावाने प्रसिद्ध होते. ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावंत आणि नाटकं त्यांनी रंगभूमीला दिली.

बाल कलावंत म्हणून राम जाधव यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. पुढे नोकरी करतानाही त्यांनी रंगभूमीची साथ सोडली नाही. मराठी नाट्यक्षेत्रातील हौशी रंगभूमीवर त्यांचे नावा सातत्याने गाजत राहिले. राज्यनाट्य स्पर्धो व कामगार कल्णाण मंडळाच्या नाट्य स्पर्धेतील अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण नाट्यसृष्टीला स्वतःच्या अभिनयाची दखल घेण्यास पार पाडले.

मामांनी अभिनयासोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखल घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. मामांनी नाट्यनिर्माते सातत्याने दीडशेच्यावर नाटकांची निर्मिती केली. राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अनेक वर्ष ते सदस्य होते.

विदर्भातील हौशी, प्रायोगिक रंगभूमीचे एक संवर्धक, आधारस्तंभ आणि तिला आकार देत, ‘रसिकाश्रय’ या त्यांच्या संस्थेमार्फत सक्रिय राखणारे ज्येष्ठ दिग्दर्शक,कलावंत तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले राम जाधव यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मराठी रंगभूमी संवर्धित करण्यात राम जाधवांचे मोठे योगदान होते. त्यांना महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि विदर्भ साहित्य संघाच्यावतीने श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अभिवादन केले.

नाट्य व सांस्कृतिक चळवळीत मोठे योगदान

अकोल्यासारख्या छोट्या शहरातून अभिनयाला सुरुवात करणारे राम जाधव यांचे विदर्भाच्या नाट्य व सांस्कृतिक चळवळीत मोठे योगदान होते. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सोबतच राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक तरुण व नवोदित नाट्य लेखकांना प्रोत्साहित केले. विदर्भच नव्हे तर संपूर्ण नाट्य क्षेत्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही अशा शब्दात अ.भा. नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे यांनी राम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com