65 वर्षांनंतर पोहोचले "आपल्या शाळेत' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

वडिलांची बदली झाल्याने त्यांनी रामटेक सोडले. आपल्या शाळेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देइना. आज मात्र त्या पाच जणांपैकी दोन बहिणी व भाऊ यांनी आपल्या कुटुंबासह शाळेला भेट दिली.

रामटेक (जि. नागपूर) :  1952-53 साली तीन बहिणी व दोन भावांनी वर्ग पाचवीत शाळेत प्रवेश घेतला. शाळेतून दहावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर वडिलांची बदली झाल्याने त्यांनी रामटेक सोडले. आपल्या शाळेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देइना. आज मात्र त्या पाच जणांपैकी दोन बहिणी व भाऊ यांनी आपल्या कुटुंबासह शाळेला भेट दिली. शाळाही आपल्या या विद्यार्थ्यांना पाहून मोहरली. 

रामटेक येथील समर्थ हायस्कूलमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास चार वाहने आलीत. वाहनातून उतरलेले तीन ज्येष्ठ नागरिक ज्यात दोन महिला व एक पुरुष आपल्या चष्म्यातून शाळेकडे अपूर्वाईने पाहताना दिसले. सोबत बरीच मंडळी होती. श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव भारतराव किंमतकर, मुख्याध्यापक दीपक गिरधर, उपमुख्याध्यापक प्रकाश कस्तुरे, पर्यवेक्षक सुभाष बघेले, बारावी व्होकेशनलचे डॉ. योगेश पावशे यांनी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली. 

हेही वाचा : रामटेककरांवर लादलेला विशेष कर रद्द 

शाळेविषयी बोलताना आनंदाने फुलले

त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून सर्वजण आश्‍चर्यचकित झाले. त्या तिघांपैकी एक होते जयसिंग देवपुत्र (वय 76), दुसऱ्या होत्या श्रीमती अंबुजा देवपुत्र (वुड)(वय 78) आणि तिसऱ्या होत्या वसुमती देवपुत्र (डॅनियल)( वय 74). जयसिंग देवपुत्र हे रिझर्व्ह बॅंकेतून व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तर दोघी बहिणी सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांची मोठी बहीण ज्योती देवपुत्र व भाऊ विजय देवपुत्र हेसुद्धा याच शाळेतून 1956 ला दहावी उत्तीर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेविषयी बोलताना त्यांचे चेहरे आनंदाने फुलून आले. त्यावेळी एम. बी. जोशी हे आमचे मुख्याध्यापक होते, असे त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा : अपमान जिव्हारी लागला, विद्यार्थिनींची आत्महत्या 

शाळेकडे वळून पाहत  घेतला निरोप

शाळेची मुख्य इमारत जशीच्या तशी असल्याचे त्यांनी आवर्जून नोंदवले. फक्त कवेलूच्या ऐवजी टिनाचे छत एवढाच बदल झालेला त्यांना दिसला. ज्या वर्गखोलीत ते बसत होते त्या वर्गखोलीत सर्वजण गेले. त्यानंतर त्यांचा एक छोटेखानी सत्कार समारंभ सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. यावेळी जयसिंग देवपुत्र यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन त्यांनी शाळेकडे वळून पाहत पाहत सर्वांचा निरोप घेतला. यावेळी श्रीमती ज्योती देवपुत्रे यांची कन्या बिशप कॉटन स्कूलच्या प्राचार्य मंजूषा स्टिफनसन, जयसिंग देवपुत्र, अंबुजा वूड व वसुमती डॅनियल यांची मुले, सुना, नातवंडेसुद्धा उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reached 65 years later at "our school"