सर्दी-खोकला ही लक्षणे आढळल्यास 24 तासात कळवा, कोण म्हणाले असे,...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

वानाडोंगरी नगरपरिषद येथील साईराम चौकात राहणारा रुग्ण हा भीमनगर येथील रुग्णांसोबत एकाच कंपनीत काम करीत होता. यात दोघेही पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने वानाडोंगरीच्या साईराम चौकातील रुग्णाच्या संपर्कातील 10 लोकांना विलगीकरण कक्षात पाठविले होते. आज त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चौघे जण सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंता पसरली आहे.

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : हिंगणा तालुक्‍यातील काही भागात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना "कंटेनमेंट झोन'ची बुधवारी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी पाहणी केली. त्यानंतर वानाडोंगरी नगर परिषद कार्यालयात त्यांनी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना या आजाराची लक्षणे (सर्दी-खोकला)असलेली व्यक्ती 24 तासात कळली पाहिजे, अशी यंत्रणा राबविण्यास जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रातील गावात तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा : पीक कर्जवाटपात बॅंका का घेतात हात आखडता, कारण आहे "हे'...

नागरिकांना ताबडतोब सुविधा पुरवा !
वानाडोंगरी नगर परिषद कार्यालयात आयोजित मिटिंगमध्ये हजर अधिकाऱ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांच्या अडचणी व व्यवस्थेबद्दल विभागीय आयुक्‍तांनी विचारणा केली. तालुक्‍यातील अधिकाऱ्यांना या कंटेनमेंट परिसरात असलेल्या नागरिकांना आवश्‍यक त्या सुविधा व साहित्य पुरविणे तसेच नियमित सॅनिटायझर फवारणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच परिसरात निरंतर सर्व्हे करून कोरोना या आजाराची लक्षणे (सर्दी-खोकला)असलेली व्यक्ती 24 तासात कळली पाहिजे, अशी यंत्रणा राबविण्यास जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.

वानाडोंगरीत एकाच कुटुंबातील चौघे "पॉझिटिव्ह'
वानाडोंगरी नगरपरिषद येथील साईराम चौकात राहणारा रुग्ण हा भीमनगर येथील रुग्णांसोबत एकाच कंपनीत काम करीत होता. यात दोघेही पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने वानाडोंगरीच्या साईराम चौकातील रुग्णाच्या संपर्कातील 10 लोकांना विलगीकरण कक्षात पाठविले होते. आज त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चौघे जण सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंता पसरली आहे.

हेही वाचा : कोरोनाचा वार; नागपुरात पाच वस्त्या सील

वानाडोंगरी नगरपरिषदेत आढावा बैठक
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, तहसीलदार संतोष खांडरे, मुख्याधिकारी भारत नंदनवार, आमदार समीर मेघे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे, वैद्यकीय अधिकारी सुरेखा सेलोकर, घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. वानाडोंगरी प्रभाग क़्र. 8 मधील नगरसेवक सभापती बालू मोरे, नगराध्यक्ष वर्षा शहाकार, नगरसेवक सभापती नितीन साखळे, नगरसेवक गुणवंता मते, सभापती आभा काळे, माजी सरपंच सतीश शहाकार, प्रकाश डाखळे घटनास्थळी उपस्थित झाले. रुग्णाच्या घराजवळील फवारणी करून परिसर सील केला असून, क्वारंटाइन करण्याची प्रकिया सुरू आहे.

हेही वाचा : झॉलिवुड फ्रांसमध्ये गाजला नागपुरकर तरूणाचा अविष्कार

आजारी रुग्णाची माहिती देण्याच्या सूचना
वाडी : सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये असे निदर्शनास आले की ज्या डेंगी, ताप, खोकला किंवा श्‍वसनाचा त्रास अशी  लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णापासून इतर व्यक्तींना संसर्ग पसरण्याची जास्त शक्‍यता असते. असे रुग्ण स्थानिक डॉक्‍टरांकडे उपचाराकरिता आल्यास त्याची माहिती त्याच दिवशी स्थानिक प्रशासनाला द्यावी. तसेच वैद्यकीय सल्ला न घेता ताप, खोकला व श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या व्यक्ती औषधी घेण्यास मेडिकल स्टोअर्समध्ये आल्यास त्यांची माहिती नगर परिषदेने दिलेल्या नमुना प्रपत्रात भरून देण्याचे आवाहन मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report cold-cough symptoms within 24 hours