आम्हाला निवृत्ती वेतनाचा लाभ मृत्यूनंतर मिळेल का? मेडिकल आणि मेयोतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सवाल

केवल जीवनतारे 
Thursday, 3 December 2020

शासकीय कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीची देय रक्कम आणि निवृत्ती वेतन अदा करण्यासंदर्भातील पत्रासह सेवापुस्तिकेनुसार सर्व कार्यवाही पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) असो की, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवृत्त कर्मचाऱ्याला आठ ते नऊ महिने लोटून गेल्यानंतरही  निवृत्ती वेतनाची फाईल तयार करण्यात आली नाही. यामुळे निवृत्ती वेतन मिळत नाही. अखेर कंटाळून येथील कर्मचाऱ्यांनी  मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल काय? असा सवाल केला आहे.  

शासकीय कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीची देय रक्कम आणि निवृत्ती वेतन अदा करण्यासंदर्भातील पत्रासह सेवापुस्तिकेनुसार सर्व कार्यवाही पूर्ण होणे आवश्‍यक आहे. मेडिकल, मेयो येथील कर्मचारी ८ ते ९ महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. निवृत्त वेतनासाठी त्यांनी खेटा मारल्या. परंतु मेडिकल, मेयोच्या प्रशासनाला जाग येत नाही. 

क्लिक करा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती

चिरीमिरीसाठी तर निवृत्ती वेतनाची प्रकरणे महिनोमहिने ताटकळत ठेवण्यात येतात अशीही शंका येते. वर्षभरात निवृत्त होणाऱ्यांची यादी प्रशासनाकडे तयार असते. यावर्षी २८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाले. यापैकी केवळ एका कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात आला. यासंदर्भात मेडिकल प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा इंटकतर्फे त्रिशरण सहारे यांनी दिला आहे.

सेवानिवृत्तीनंतरचा नियम

कर्मचारी ज्या दिवशी निवृत्त होतो, त्या दिवशी देय असलेली रक्कम तसेच निवृत्ती वेतनासंदर्भातील कागदपत्रे त्यांच्या सुपूर्द करावे लागतात. परंतु मेडिकल, मेयोतील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके तयार होत नसल्याचे दिसून येते. 

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

मेयोत झाला होता कर्मचाऱ्याचा मृत्यू

जुलै २०१९ मध्ये मेयो रुग्णालयातून कृष्णा धार्मिक निवृत्त झाले होते. यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी तसेच इतरही कामाच्या निमित्ताने वारंवार खेटा घातल्या. विनवणी केली, परंतु इनकॅशमेंट पेमेंट मिळाले नाही. त्यावेळी माझ्या मृत्यूनंतर निवृत्तीनंतरचे लाभ मिळतील काय? असा सवाल केला. पुढे काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी सहारे यांनी पुढाकार घेत त्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न सोडवला होता.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retire Workers in medical and meyo still not getting pension