VIDEO: यमाला भेटायचयं ? गुमगाव चौकात या!; वाहनांची 'स्पीड' ठरतेय जीवघेणी

रवींद्र कुंभारे
Wednesday, 2 December 2020

चौकात जागोजागी पडलेले खड्डे, इकडे-तिकडे विखुरलेली गिट्टी, गुमगाव-हिंगणा मार्गाचे कासवगतीने सुरू असलेले बांधकाम आणि अमरावती-जबलपूर मार्गावरील वाहनांची 'स्पीड' मुख्यतः अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने चौक सध्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

गुमगाव (जि. नागपूर): अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील गुमगाव-हिंगणा मार्गांला जोडणारा चौक सध्या चौफेर जीवघेणा ठरत आहे. या चौकामध्ये होणाऱ्या अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चौकाचे निरीक्षण केल्यास अपघातग्रस्त गाडीचे काच व पार्ट नेहमीच पडलेले दिसून येतात. 

चौकात जागोजागी पडलेले खड्डे, इकडे-तिकडे विखुरलेली गिट्टी, गुमगाव-हिंगणा मार्गाचे कासवगतीने सुरू असलेले बांधकाम आणि अमरावती-जबलपूर मार्गावरील वाहनांची 'स्पीड' मुख्यतः अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने चौक सध्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जाणून घ्या - धक्कादायक आकडेवारी! यवतमाळ जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल २५० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

अमरावती-जबलपूर मार्गावरील गुमगाव-हिंगणा चौकातून जाणाऱ्या वाहनांमध्ये 'ओव्हरटेक' करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. गुमगाव-हिंगणा मार्गाने होणारी जडवाहतुक यामध्ये पुन्हा 'टेन्शन' देण्याचे काम करते. सोबतच चौकामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येत लागत असलेली जडवाहनांची रांग हृदयात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. 

 

 

चौकात कित्येक अपघात झालेले असून अनेकांना यामध्ये प्राणसुद्धा गमवावे लागले आहे. विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, सायकलचालक, पुरुष असो की महिला हा चौक जीव मुठीत घेऊनच ओलांडताना दिसतात. कारण या मार्गावरील बेशिस्त वाहतूक बघून कोणीही घाबरल्याशिवाय राहणार नाही. 

क्लिक करा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर! 

चौकामध्ये प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रात्री तर परिस्थिती अधिकच बिकट होते. प्रशासनाने अपघाताची वाट न बघता ताबडतोब 'गाडी हळू चालवा' असे फलक लावून योग्य जनजागृती करावी. चौकात प्रकाशाची पुरेशी व्यवस्था, गुमगाव-हिंगणा मार्गाची जडवाहतुक थांबवून चौकात सायंकाळी उभे राहणारे ट्रक हटवणे गरजेचे झाले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of life due to high speed of vehicles at Gumgaon square Nagpur