आयुक्त तुकाराम मुंढेंना घेरण्याची तयारी केली जात आहे...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

सत्ताधाऱ्यांकडून आयुक्तांवर सातत्याने होणारे आरोप, त्याला विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना दिलेली साथ, हे सारे बघता महापालिकेची सभा वादळी ठरण्याची शक्‍यता आहे.

नागपूर : शहरातील कोरोनासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजना, आयुक्तांनी काढलेल्या आदेशांबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून अनेकदा झाला. आता महापालिकेच्या सभेत याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष प्रशासनाची कोंडी करणार असल्याचे संकेत काही सदस्यांनी दिले. त्यामुळे प्रथमच रेशीमबागेतील सुरेश भट सभागृह नगरसेवक व प्रशासन यांच्यातील शाब्दिक द्वंद अनुभवणार आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

महापालिकेची शेवटची सभा 20 मार्चला पार पडली होती. तीन महिन्यांनंतर महापालिकेची सभा येत्या 20 जून रोजी होत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी प्रथमच सभेचे आयोजन महाल येथील नगर भवनाऐवजी प्रशस्त आसन असलेल्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात होणार आहे.

या सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात केलेल्या उपाययोजनांबाबत नोटीसद्वारे प्रश्‍न उपस्थित केला आहे. मार्चपासून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे एकहाती प्रयत्न करीत आहेत.

शहरातील विविध भाग प्रतिबंधित करण्यासंबंधी त्यांनी काढलेले आदेश, विलगीकरणासाठी केलेली सक्ती याबाबत अनेकदा सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. आयुक्त हुकूमशहा आहेत, असा आरोपही महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्याने केला.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

त्यामुळे एकूणच लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त, असा संघर्ष चव्हाट्यावर आला. सत्ताधाऱ्यांकडून आयुक्तांवर सातत्याने होणारे आरोप, त्याला विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना दिलेली साथ, हे सारे बघता महापालिकेची ही सभा वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. याशिवाय प्रश्‍नोत्तराच्या तासात प्रफुल्ल गुडधे कचरा उचल करणाऱ्या कंपनीने लॉकडाउनच्या काळात काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरही बोट ठेवणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या निर्णयांवरून आयुक्त मुंढे यांना लक्ष्य केले जाणार, हे जवळपास निश्‍चित आहे. एवढेच नव्हे, तर आयुक्तांना सभेच्या दिवशी रजा देण्यात आल्यासंदर्भात आमदार प्रवीण दटके प्रश्‍न उपस्थित करणार आहेत. एकूणच ही सभा आयुक्तांवरील अविश्‍वास ठरावासाठी पायाभरणी ठरण्याची शक्‍यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruling and opposition parties unite against the nmc administration