डिगडोहचे साईनगरवासी विचारतात, 14, 28 दिवस, एक महिना की दोन महिने, सांगा, सांगा...

हिंगणा एमआयडीसी  :  गेल्या 25 दिवसांपासून सील ठोकण्यात आलेला साईनगर परिसर.
हिंगणा एमआयडीसी : गेल्या 25 दिवसांपासून सील ठोकण्यात आलेला साईनगर परिसर.

नागपूर ग्रामीण : कोरोना "पॉझिटिव्ह' रूग्ण आढलल्यास आजाराचा संपर्क वाढू नये म्हणून त्याचा परिसर "सील' करण्यात येतो. हा कालावधी 14 किंवा 28दिवसाचा असल्याचे सांगण्यात येते. शेवटचा रूग्ण आढळल्यापासूनचे 28 दिवस "सील' ठेवण्यासाठी मोजले जातात. परंतू या दरम्यान जर रूग्णच आढळला नसेल तर? रूग्णांची संख्या वाढत असताना हा निर्णय योग्य आहे. परंतू एक महिन्यापर्यंत परिसरात एकही रूग्ण आढळला नसल्यास प्रशासन कोणते पाउल उचलेल, अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. डिगडोह येथील साईनगर या परिसरात आतापर्यंत केवळ एकच रूग्ण आढळला आणि आता पंचेविस दिवस लोटल्यानंतरही परिसरातील नागरिकांना बंदीस्त का ठेवण्यात येत आहे, असा संतप्त प्रश्‍न येथील रहिवाशांनी केला आहे.

अधिक वाचा : बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या नव्या सूचना जाहीर वाचा ...

सारे काही बदलून गेले
कोरोना आजारामुळे सारे काही बदलून गेले. रोजगार ठप्प पडले. अनेक जण बेरोजगार झाले. सामाजिक परिस्थितही परिवर्तन झाले. दररोजचे वागणेही बदलून गेले. नागपूर शहरापासून हाकेच्या अंतरावरील हिंगणा एमआयडीसीत चोरटया पावलांनी कोरोनाचे आगमण झाले. लोकमान्य नगरात 69 वर्षीय रूग्ण "पॉझिटिव्ह' निघाल्यानंतर लोकमान्य नगर परिसर सील करण्यात आले. येथून खरे तर हिंगणा तालुक्‍यात कोरोनाची सुरूवात झाली. त्यानंतर संपर्कातील चार ते पाच व्यक्‍तींही कोरोनाबाधीत निघाल्या. अमरनगर परिसरात तर "कोरोनास्फोट' झाला. रूग्णांची संख्या भरमसाठ वाढत गेली. पारधी नगर, साईनगर, भीम नगर, इसासनी आदी भागात बाधितांची संख्या पाहून प्रशासन हादरले. एमआयडीसीत कोरोनाचा प्रसार होण्यासाठी एमआयडीसीतील एका कंपनीचे स्वैर वर्तन कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कंपनीला टाळे ठोकण्यात आले. एमआयडीसी या कामगारबहुल वसाहतीत रूग्णांची संख्या वाढत असताना तो परिसर सील करण्यात आला. आता कुठे दोन जुलै रोजी महत्‌प्रयासानंतर तेथील सील काढण्यात आले.

अधिक वाचा: यांचाही होतो वाढदिवस...

साईनगरवासींची एक महिन्यांपासून कोंडी
साईनगरात एक महिला कोरोनाबाधित आढळल्यानंतर 15 जूनला परिसराला सील करण्यात आले. महिलेच्या घरातील व संपर्कातील सदस्यांना क्‍वारंटाईन ठेवण्यात आले. दरम्यान रूग्ण व तिच्या परिवारातील सगळयांची या भयाण आजारातून मुक्‍तता झाली. साईनगर परिसरात त्यानंतर एकही रूग्ण आढळला नाही. आज एक महिन्याचा कालावधी उलटला तरी परिसरातून सील काढण्यात आले नसल्याने अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकमान्य नगरातील सील गेल्या दोन जुलै रोजी हटविण्यात आले. त्यानंतर तालुक्‍यातील परिस्थिती नियंत्रणाखाली आली असताना एक महिनाभर सील ठोकून सील ठोकलेल्या परिसरातील नागरिकांची कोंडी का करण्यात येते, हे मात्र कोडेच आहे. याबाबतीत अधिका-यांशी चर्चा केली असता परिसरात रूग्ण आढळल्यास तेथील परिसराला सील करण्यात येते. पण यावरून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सील 14 की 28 दिवसपर्यंत ठेवण्यात येते. परंतू नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने दोन गट पाडलेले दिसतात. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना वेगवेगळे नियम लावण्यात येत आहे का? शहरासाठी 14 तर ग्रामीणसाठी 28 दिवस का, असा प्रश्‍न करण्यात येत आहे. डिगडोह ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या साईनगरात पुन्हा एकही रूग्ण आढळला नसताना पंचेविस दिवस झाले तरी तेथील सील हटविण्यात आले नाही. यावरून जनतेत विचारणा करण्यात येत आहे. अधिकारी ही बाब जनतेत स्पष्ट करीत नसल्याने जनतेत संभ्रमाची स्थिती कायम आहे.

कोरोनापेक्षाही भयंकर स्थिती
कोरोनापेक्षाही कोरोनानंतरची परिस्थिती भयाण आहे. परप्रांतातून आलेले अनेक जण एमआयडीसीतून गावी परत गेले आहेत. बाहेरगावी असलेले गावला परत आले आहेत. त्यांच्यापुढे रोजगाराचे साधन नाही. परिसर सील केल्यानंतर उद्योगधंदे, किराणा व्यापारी, नोकरीचाकरी करणा-यांची कोरोनापेक्षाही भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. कुठलेच काम करता येत नाही. नागरिकांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. प्रशासन सील तर लावते, परंतू नियोजन करून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यात कमी पडत आहे.

नियम सारखेच आहेत
रूग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात शेवटचा रूग्ण आढळत नाही तोपर्यंत सील कायम राहते. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण यांच्यासाठी वेगवेगळे नियम नाहीत. साईनगर येथील सील केव्हा हटविण्यात येईल, हे मी माहिती घेतल्यानंतर सांगेन.
इंदिरा चौधरी
उपविभागीय अधिकारी
हिंगणा

नागरिकांना मोकळे करा
सील असल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. सील लावल्यापासून एक महिन्याचा कालावणी होत आहे. परिसर कोरोनामुक्‍त असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांची मुक्‍तता करावी.
बंडू बोंडे
ग्रामपंचायत सदस्य

15 तारखेला सील हटविण्यात येईल
16 जूनला परिसर सील करण्यात आला होता. आता जवळजवळ एक महिना पूर्ण झाल्यानंतर साईनगर परिसर सीलमधून बाहेर पडेल.
इंद्रायणी काळबांडे
सरपंच, डिगडोह ग्रामपंचायत

संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com