
कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून थोडाफार अभ्यास सुरू करण्यात आला होता. महत्त्वाचे महिने वाया गेल्याने काही अभ्यासक्रमसुद्धा गाळण्यात आला आहे
नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव बघता तसेच दुसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्गमित केले. मात्र, दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून थोडाफार अभ्यास सुरू करण्यात आला होता. महत्त्वाचे महिने वाया गेल्याने काही अभ्यासक्रमसुद्धा गाळण्यात आला आहे. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये याकरिता शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार ऑनलाइन शिक्षण पूर्ववत सुरू ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - "मेरा जमीर अब भी जिंदा है" असं म्हणत पोलिस...
विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरूच राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आला आहे. मात्र, जागतिक स्तरावरील कोविडच्या उद्रेकाचे अवलोकन केले असता धोका टाळता येऊ शकत नाही. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली दिसून येत आहेत. भारतामध्ये दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोविडच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता महाराष्ट्रातही तशी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीनंतर नागपूर शहरामध्येही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
नक्की वाचा - मोबाईल चोरी करून सोशल मीडियावर करत होता विक्री; अखेर...
मागील सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १३ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मनपातर्फे घेण्यात आला होता. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी यांनी समन्वयन आणि संनियंत्रण करावयाचे आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असाही इशारा आयुक्तांनी दिला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ