
वाडी (जि.नागपूर) : 14 दिवसांपूर्वी कोरोना आजाराच्या संशयाने उपचारासाठी नागपूरला सुरक्षित ठेवलेल्या एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक न. प. व पोलिस प्रशासनाला प्राप्त होताच खळबळ उडाली. मात्र, सकाळी डॉ.आंबेडकरनगरातील "सील' केलेले रस्ते व तेथील सुरक्षा दुपारी बाराच्या सुमारास हटविल्याने जनतेत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
वाडीतील रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?
प्राप्त माहितीनुसार डॉ. आंबेडकरनगरातील एका व्यक्तीला कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने स्थानिक आरोग्य विभागाने त्याला नागपूरला तपासणी व उपचारासाठी दाखल केले. आमदार निवासात तो देखरेखीखाली होता. इकडे नगर परिषद व पोलिस प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लॉकडाउनमध्ये जाहीररित्या न करता साजरी करण्याचे आवाहन केले. तसा जनतेनेही त्यांना प्रतिसाद दिला. परंतु, अचानक 13 एप्रिलच्या रात्री न. प. प्रशासनाला नागपुरात क्वारंटाइन असलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची सूचना प्राप्त होताच खळबळ उडाली. रात्रीच नगराध्यक्ष प्रेम झाडे, मुख्याधिकारी जुम्मा प्यारवाले, पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन डॉ. आंबेडकरनगरला "सील' करणे व सर्वेक्षण करून इतर उपाययोजना करण्याचे निश्चित केले. 14 एप्रिलला सकाळी पोलिसांनी डॉ.आंबेडकरनगराची चारही बाजूने घेराबंदी केली. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे डॉ. आंबेडकर व तथागत बुद्धाच्या प्रतिमा परिसराच्या प्रवेशद्वाराला कुलूपबंद करण्यात आले. खरेच हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला काय, असा जनतेत संभ्रम निर्माण झाला.
आदेशान्वे कार्यवाही
याबाबत प्रतिनिधीने व्याहाड आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी, न. प.च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अचानक बंदोबस्त का हटविण्यात आला, याबाबत विचारणा केली असता याचा अधिकृत कुणीही केला नाही. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये बंदोबस्त हटविल्याचे सांगितले.
जिल्हा प्रशासनाची तांत्रिक चूक
आता जनतेत हा प्रश्न निर्माण झाला की या वसाहतीतील व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट खरच पॉझिटिव्ह आला काय? आला तर सील का उघडले? रिपोर्ट चुकीचा असेल तर ही कार्यवाही कशाच्या आधारावर करण्यात आली, हा तपासणीचा विषय निश्चित आहे. परंतु आमदार निवासातील संशयीत रूग्णाच्या बाबतीतील तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचे कळते.
नागरिकांनी सहकार्य करावे
एका रुग्णाची पॉझिटिव्ह रिपोर्टची माहिती प्राप्त झाल्याने ही कार्यवाही करण्यात आली. आंबेडकरनगरचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून घरपोच रेशन व भाजीपाला पोहोचविण्याचे नियोजन न. प.,पोलिस विभागाच्या सहकार्याने करणार आहे. आशावर्कर प्रत्येक घरी जाऊन तपासणी करीत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.
प्रेम झाडे
नगराध्यक्ष, वाडी न. प.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.