कॉल रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून करायचा व्हाट्सऍप कॉल अन्‌ मागायचा खंडणी, आता...

Search for absconding Yuvasena president Vikram Rathore begins
Search for absconding Yuvasena president Vikram Rathore begins

नागपूर : सावकाराला ब्लॅकमेल करून पाच लाखांची वसुली करणाऱ्या युवा सेनेचा फरार झालेला अध्यक्ष विक्रम राठोडचा पोलिस शोध घेत आहेत. खंडणी स्वीकारणाऱ्या शिवसेनेच्या संजोग राठोडला पोलिसांनी शनिवारीच बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात नेले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूब बाशा हे सावकारी करतात. त्यांच्याकडे सरकारचा परवानासुद्धा आहे. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा लघुउद्योगासाठी कर्ज स्वरूपात रक्‍कम बाशा देतात. युवासेनेचा अध्यक्ष विक्रम सुरेश राठोड याला बाशा यांच्या व्यवसायाबाबत माहिती मिळाली. त्याने शिवसेनेचा पदाधिकारी असलेला भाऊ संजोग राठोड याच्याशी संगनमत करून बाशा यांना 15 लाखांची खंडणी मागितली. 

खंडणी न दिल्यास पत्रकार परिषद घेऊन बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच सावकारीचा परवाना रद्द करण्याची धमकी देत पहिला टप्पा म्हणून पाच लाखांची खंडणी मागितली. शनिवारी बाशा यांनी अजनीचे ठाणेदार संतोष खांडेकर यांची भेट घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पीआय खांडेकर यांनी मेडिकल चौकात सापळा रचला. विक्रमने आपला मोठा भाऊ संजोग याला खंडणी वसूल करण्यासाठी मेडिकल चौकात पाठवले. बाशा यांच्याकडून खंडणी घेताच अजनी पोलिसांनी संजोग राठोडला अटक केली. 

विक्रम राठोडविरुद्ध समोर यावे

युवा सेनेचा विक्रम राठोड आणि शिवसेनेचा संजोग राठोड या दोघा भावंडानी आतापर्यंत अनेक सुपारी व्यापारी, किराणा व्यापारी, प्रॉपर्टी डिलर, सावकार आणि बिल्डरला धंदा बंद करण्याची धमकी देऊन आतापर्यंत कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी किंवा पीडितांनी विक्रम राठोडविरुद्ध समोर यावे व पोलिसात तक्रार द्यावी. पोलिस गांभीर्याने दखल घेऊन राठोड बंधूंवर कठोर कारवाई करतील, असे आवाहन अजनी पोलिसांनी केले आहे.

मोठ्या नेत्याकडे लपल्याची शहरभर चर्चा​

युवासेनेचा जिल्हाप्रमुख विक्रम राठोड हा बाशा यांना वॉट्‌सऍपवर कॉल करीत होता. कॉल रेकॉर्डिंग होऊ नये याची खबरदारी तो घेत होता. भाऊ संजोगला खंडणी घेताना पोलिसांनी अटक केल्याची माहिती होताच विक्रम राठोड फरार झाला. तो सध्या ग्रामीण भागातील मोठ्या नेत्याकडे लपल्याची शहरभर चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com