अरेच्चा ! ग्रामसभा अर्धवट सोडून सचिव पळाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

सभेचे विषय अर्धवट सोडून सचिवाने सभेतून पळ काढल्याचा आरोप सभाध्यक्ष व गावकऱ्यांनी केला आहे.

भिवापूर (जि.नागपूर)  :  विविध योजनांकरिता शासन निधीच्या जमाखर्चाचा गावकऱ्यांनी मागितलेला हिशेब न देताच सचिवाने ग्रामसभेतून पलायन केल्याची घटना आलेसूर येथे गणराज्यदिनी घडली. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सचिवाविरुद्ध कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

क्‍लिक करा  :  खुश खबर... खुश खबर...गहू झाला स्वस्त

 

विविध योजनांचा गावकऱ्यांनी मागितला हिशेब
26 जानेवारीला आलेसूर गट ग्रामपंचायततर्फे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण राजनहिरे यांच्या अध्यक्षतेत सभा पार पडली. विषयपत्रिकेत नमूद विषयांनुसार सभा घेणे आवश्‍यक आहे. परंतु, सभेचे विषय अर्धवट सोडून सचिवाने सभेतून पळ काढल्याचा आरोप सभाध्यक्ष व गावकऱ्यांनी केला आहे. सभेत गावकऱ्यांनी 13 व 14 वित्त आयोग, दलित वस्ती, ठक्कर बाप्पा योजना, पंतप्रधान ग्रामविकास या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतला प्राप्त निधी व त्यातून करण्यात आलेली कामे, तसेच मुद्रांक शुल्क, रॉयल्टी या माध्यमातून प्राप्तनिधी व करण्यात आलेला खर्च, गावकऱ्यांकडून वसूल करावयाची एकूण कराची रक्कम, थकीत असलेला एकूण कर याबाबतच्या माहितीची गावकऱ्यांनी सचिवाकडे मागणी केली. परंतु, सचिव शेंबेकर यांनी वरीलपैकी कोणतीच माहिती ग्रामसभेत सादर केली नाही. विशेष म्हणजे, ही माहिती ग्रामसभेत सादर करण्यात यावी, यासाठी सभेच्या दोन दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात रीतसर अर्ज दिला होता. त्यानंतरही गावकऱ्यांनी मागितलेली माहिती सादर न करता सचिव शेंबेकर सभा तशीच सोडून निघून गेल्यात. त्या परत येतील या आशेने गावकरी तीन वाजेपर्यंत सभास्थळी थांबून होते. परंतु, सचिव परतल्या नाहीत. सभेत हजर असलेले सरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी काही वेळ थांबून नंतर घरचा रस्ता धरला.

क्‍लिक करा  :  अरे भाउ ! तुकाराम मुंढे आहेत ते, जरा कडक सॅल्यूट मार ...

जिल्हाधिका-यांना निवेदन
सचिवाने ग्रामसभा अर्धवट सोडून पलायन केल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. सचिव शेंबेकर कार्यालयात नेहमीच गैरहजर असतात. त्यामुळे गावकऱ्यांना कामासाठी कितीतरी दिवस ताटकळत राहावे लागत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

क्‍लिक करा : तुम्हीच सांगा जी....निदानच झाले नाही तर उपचार कसे होणार?

ग्रामसभेचा झाला अपमान
सचिव शेंबेकर सभा अर्धवट सोडून गेल्याने विषयपत्रिकेत नमूद विषयांवर सभेत चर्चा होऊ शकली नाही. गावकऱ्यांनी सभेत उपस्थित केलेले प्रश्‍न हे विषयपत्रिकेनुसारच होते. सभा अर्धवट सोडून जाणे हा ग्रामसभेचा अपमान असून सचिवाविरुद्ध कारवाई होणे आवश्‍यक आहे.
प्रवीण राजनहिरे, ग्रामसभा अध्यक्ष, आलेसूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The secretary escaped leaving the Gram Sabha half