नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यात सतरा लाखांहून अधिक पैसे जमा; प्रशासनाने दाबले प्रकरण 

केवल जीवनतारे
Friday, 27 November 2020

२०१५ पासून हा प्रकार सुरू होता. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत हा प्रकार सुरू होता. त्या कारकुनाच्या खात्यात १७ लाखांहून अधिक पैसे जमा झाले होते. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार होणे आवश्यक होते. परंतु, गुप्तपणे पुन्हा एसबीआयकडे पैसे पाठविण्यात आले आणि हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) प्रशासकीय व वेतन विभागातील कर्मचारी-अधिकारी यांच्या संगनमताने १७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याची घटना घडली. वैद्यकीय अधिकाऱ्याचा करार संपल्यानंतर वैद्यकीय अधिकारी नोकरी सोडून गेला. मात्र, त्याच्या वेतनाची रक्कम एका कारकुनाच्या खात्यात जमा करण्यात येत होती. गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले. मात्र, पोलिसात तक्रार न करता गैरव्यवहारातील रक्कम थेट बॅंकेच्या खात्यात जमा करण्यात आली. अशा प्रकारे प्रशासनाने चुकीला माफी देऊन प्रकरणावर पडदा पाडला.

सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये करारावर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. करार संपल्यानंतर त्यांचे खाते बंद केले जाते. मात्र, कारकुनाने त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा करार पूर्ण झाल्यानंतर, त्याचा अकाउंट नंबर बदलून त्या ठिकाणी स्वतःचा खाते क्रमांक टाकला. वेतनाची रक्कम त्याच्या खात्यात जमा होत होती. वारंवार ही रक्कम ट्रान्सफर होत असल्याने बॅंकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने चौकशी केली. यात हा प्रकार उघडकीस आला.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

२०१५ पासून हा प्रकार सुरू होता. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत हा प्रकार सुरू होता. त्या कारकुनाच्या खात्यात १७ लाखांहून अधिक पैसे जमा झाले होते. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार होणे आवश्यक होते. परंतु, गुप्तपणे पुन्हा एसबीआयकडे पैसे पाठविण्यात आले आणि हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. लिपिकाची बदली झाली. मात्र, या प्रकरणात अधिक धागेदोरे सापडतात काय याची चौकशी सुरू आहे. कर्तव्यावर नसलेल्या डॉक्टरची उपस्थिती, त्याची उपस्थिती कशी ठेवली गेली, पाच वर्षांपासून कोणाला याची माहिती का मिळाली नाही, त्यात कोण सहभागी होते, पोलिस तक्रार का केली नाही, असे अनेक प्रश्न पुढे आले आहेत. 

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

बॅंके बदलल्याने घोळ

बऱ्याच काळापासून सर्व सरकारी अधिकारी आणि इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्‍यांचे वेतन खाते अ‍ॅक्सिस बँकेत होते. यानंतर ही सर्व खाती एसबीआय बँकेत हस्तांतरित करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचे संकट आले. यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली. एसबीआयकडे हस्तांतरित केलेली काही खाती होती. तर काही खाती अ‍ॅक्सिस बँकेत राहिली. अ‍ॅक्सिस बँकेत असलेली सर्व खाती थेट खात्यात पैसे येण्याऐवजी एसबीआयच्या एसबीआय खात्यांकडे जाऊ लागली. काही काळापूर्वी अ‍ॅक्सिस बँकेच्या अकाउंट ऑफिसरने (एओ) चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याची माहिती मिळाली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventeen lakh misappropriation in medical hospital