शंकरबाबांची २४ वी लेक विवाहबद्ध; वधुपिता गृहमंत्री, तर जिल्हाधिकारी बनले वरपिता

shankarbaba papalkar daughter married in nagpur
shankarbaba papalkar daughter married in nagpur

नागपूर : अनाथांचे नाथ अशी ओळख असलेले ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची २४ वी लेक आज संत्रानगरीत आयोजित सोहळ्यात विवाहबद्ध झाली. पारंपरिक रीतीरिवाजांसह हा मंगल सोहळा पार पडला असला तरी तो सर्वार्थाने हटके असाच ठरला. वधुपिता म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरपिता म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विवाह सोहळ्याचे कर्तव्य पार पाडले. भव्य व्यासपीठावर अक्षतांचा वर्षाव करीत वऱ्हाडी मंडळींनी नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. बँडपथकासह सनई चौघडे, तुतारी आणि भालदार-चोपदारांचे पथकही दिमतीला होते. 

मतिमंद व मूकबधिर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या वर्षा शंकरबाबा पापळकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा शाही लग्नसोहळा प्रदीर्घकाळ नागपूरकरांच्या स्मरणात राहणारा ठरला. वधुपिता-माता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व आरती देशमुख यांनी कन्यादान केले. २३ वर्षांपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत पोलिसांना मिळालेल्या मुकबधीर वर्षाचे संगोपन अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर अनाथालयात झाले. शंकरबाबांनी तिचा आईवडिलांप्रमाणे सांभाळ करून तिला वडिलाचे नाव दिले. स्वत:च्या पायावर उभे केले. डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाचा समीरही वझ्झर येथील अनाथालयात लहानाचा मोठा झाला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली. नंतरच दोघांच्याही इच्छेप्रमाणे शंकरबाबा यांनी त्यांच्या विवाहाला संमती दिली. 

आज हा अनोखा, भव्यदिव्य व देखणा विवाहसोहळा पार पडला. विस्तीर्ण पटांगणात केलेली दीपमाळांची लक्षवेधी आरास, फटाक्यांच्या आतषबाजीत नवऱ्या मुलाचे घड्यावरून लग्नमंडपी आगमन झाले. तिथून बग्गीतून विवाहस्थळी पोहोचला. नवरीही डोलीतून मंडपी पोहोचली. अनिल देशमुख आणि रवींद्र ठाकरे यांनी स्वःता डोलीचा भार आपल्या खांद्यावर घेतला. शेकडो प्रतिष्ठित नागरिकांनी या सोहळ्याला हजेरी लावून संसारोपयोगी भेटवस्तू देत वधू-वराला शुभाशीर्वाद दिले. 

शंकरबाबा स्टेजपासून लांबच - 
शंकरबाबांनी आजवर २४ लेकींचे लग्न लावून दिले. पण, दरवेळीच ते स्टेजपासून लांब राहतात. आजही लाग्नसोहळ्याची संपूर्ण तयारी होईस्तोवर ते विवाहस्थळी होते. ऐनवेळी मात्र ते दिसले नाही. स्टेजवरून आवाहन करूनही ते आले नाहीत. वऱ्हाड्यांची गर्दी असली तरी वधू-वरांचे डोळे मात्र शंकरबाबांनाच शोधत असल्याचे जाणवत होते. 

निराश्रीत, दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी प्रेरणा देणारा हा सोहळा आहे. आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्या समाजातील घटकांनी दिव्यांगांच्या विवाहासाठी पुढाकार घेतल्यास चांगले कार्य उभे राहू शकेल. त्यासाठी दातृत्वाच्या भावनेतून समोर यावे. 
- अनिल देशमुख, गृहमंत्री (वधुपिता) 

मतिमंद, दिव्यांग, आश्रितांना सर्वसामान्यांप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे. केवळ समाजाने त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा विवाहसोहळा आहे. मलाही त्यात खारीचा वाटा उचलता आला त्याचा आनंद आहे. निराश्रितांना आधार देणारे शंकरबाबा पापळकर हे खरे रोलमॉडल आहेत. 
-रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी (वरपिता )
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com