
नागपूर : कोरोनाने जागतिक महासत्ता म्हणून गणल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या नाकी नऊ आणले असून, सर्वाधिक नुकसान पोहोचविले आहे. कोरोनाला हरविण्यात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत असतानाच सर्वसामान्य अमेरिकावासीही या लढाईत योगदान देत आहेत. या कठीणप्रसंगी जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या या कोरोना योदध्यांचे अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका नागपूरकर महिलेने अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.
तिने आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर 'थँक यू' अशी पाटी व 'ट्युलिप'ची कागदी फुले ठेवली असून, घरी येणारा प्रत्येक व्यक्ती ती भेट आनंदाने स्वीकारून तिच्याबद्दल आदर व्यक्त करतो आहे. तिच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे. श्वेता पुष्कर कुळकर्णी तिचे नाव. अमेरिकेत सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक कोरोनाचा उद्रेक झाला. पाहतापाहता या आजाराने हजारो अमेरिकावासींचे बळी घेतले. या आणीबाणीच्या परिस्थितीत तेथील नागरिकांना घरात लॉकडाउन व्हावे लागले. त्यामुळे श्वेताच्या पतीसह बहुतांश अमेरिकन कर्मचारी सध्या 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत. या कठीणप्रसंगी अनेक जण अत्यावश्यक सेवा पुरवून देशवासींची मदत करीत आहेत. जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या या कोरोना योदध्यांसाठी काहीतरी करावे, असा विचार श्वेताच्या मनात आला. तिने चार ओळींची 'थँक यू' अशा आशयाची नोट दारावर चिकटवली. शिवाय अमेरिकेत सर्वांना आवडणारे व केवळ उन्हाळ्यातच (वसंत ऋतूत) फुलणारी दहा ते बारा 'ट्युलिप'ची फुले लावली. श्वेताने विविध रंगांची ही कागदी फुले स्वतःच्या हाताने तयार केली हे उल्लेखनीय.
कोरोनामुळे सध्या घराबाहेर पडणे अवघड झाल्याने अनेक जण किराणा, भाजीपाला व अन्य वस्तू ऑनलाइन मागविताहेत. या वस्तू आणून देणारा कुरिअर बॉय किंवा कचरा नेणारा कर्मचारी दारावरील पाटी वाचून एक फुल घेऊन जातो आणि मनातून श्वेताचे आभार मानतो. आतापर्यंत घरी आलेल्या अनेकांनी दारावरील फुले नेल्याचे श्वेताने सिएटल येथून 'सकाळ'शी बोलताना सांगितले. श्वेताची ही कल्पना पाहून तिच्या कंसासमधील एका भारतीय मैत्रिणीनेही असाच प्रयोग केल्याचे तिने सांगितले. अमेरिकेत कोरोनाने हा:हाकार माजविला असला तरी येथील नागरिक अजिबात 'पॅनिक' नसल्याचे ती म्हणाली. घराबाहेर न पडणे आणि 'सोशल डिस्टन्सिंग'च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे, हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे. स्वतः श्वेताही जानेवारीपासून घराबाहेर पडली नाही. मायदेशातील नागरिकांनाही तिचा हाच संदेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी व माझ्या अनेक मैत्रिणींनी दिवे लावल्याचे ती म्हणाली.
हे सुद्धा वाचा - दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने आणण्यासाठी प्रयत्न सूरू
मोदींच्या निर्णयाने अमेरिकावासी प्रभावित
कोरोनाची स्थिती हाताळण्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अपयशी ठरल्यामुळेच तिथे मृत्यूचे तांडव सुरू असल्याची सध्या जगभर जगभर आहे. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचीही सर्वत्र स्तुती होत आहे. मोदींनी योग्यवेळी घेतलेल्या अचूक निर्णयाने अमेरिकावासीदेखील कमालीचे प्रभावित झाले आहेत. भारतातील परिस्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळल्याबद्दल येथील सर्वच जण मोदींचे कौतुक करीत असल्याचे श्वेताने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.