नागपुरात शिवसेनेला खिंडार; निष्ठावंतांचे डिमोशन, आयारामांना प्रमोशन

राजेश चरपे
Tuesday, 12 January 2021

शिवसेनेने आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर नागपूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली असून शहराचे संपर्क प्रमुख म्हणूनसुद्धा त्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी 'बाबूजी' यांच्या काँग्रेसमधील समर्थकांना शिवसेनेत आणून त्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे

नागपूर : शिवसेनेत अलीकडेच प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत प्रमोशन आणि निष्ठावंतांचे डिमोशन केल्यामुळे शिवसेनेत असंतोष उफाळून आला आहे. सेनेचे पूर्व विदर्भाचे समन्वयक प्रकाश वाघ यांच्यासमोर अनेकांनी नाराजी दर्शवून पदाचा राजीनामे दिल्याने महापालिकेच्या निवडणुकीत भगवा फडकणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

शिवसेनेने आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर नागपूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली असून शहराचे संपर्क प्रमुख म्हणूनसुद्धा त्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी 'बाबूजी' यांच्या काँग्रेसमधील समर्थकांना शिवसेनेत आणून त्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. माजी नगरसेवक दीपक कापसे यांना शहर प्रमुख, तर प्रमोद मानमोडे यांना जिल्ह्याचे प्रभारी केले आहे. हे करताना यापूर्वी जिल्हा, शहर प्रमुख म्हणून असलेल्या शिवसैनिकांचे डिमोशन करण्यात आले. जिल्हा प्रमुखांना उपजिल्हा तर शहर प्रमुखांना उप शहर प्रमुख करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी कार्यकारिणी घोषित होताच आपली नाराजी व्यक्त केली आणि पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर पुन्हा शिवसेनेने कार्यकारिणीचा विस्तार केला. विधानसभा प्रमुख ते शाखा प्रमुखांची नियुक्ती केली. त्यातही हाच प्रकार कायम राहिल्याने असंतोष आणखी उफाळून आला आहे. 

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अंकिताने सांगितले होते आरोपीचे नाव; पहिल्या दिवशी नोंदविली...

सोमवारी शिवसेनेचे समन्वयक प्रकाश वाघ नागपूरमध्ये होते. रविभवन येथे त्यांना गाठून निष्ठावंतांनी आपली नाराजी व्यक्त केली. पद द्यायचे नसेल तर नका देऊन मात्र डिमोशन करू नका अशी विनंती केली. जिल्हा प्रमुखाला उपशहर प्रमुख करण्यात आल्याचेही त्यांनी वाघ यांच्या निदर्शनास आणून दिले. माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपण जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे कळविले होते. दुसरे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी मौन बाळगले होते. मात्र, त्यांनीही पदभार स्वीकारला नाही. विद्यमान कार्यकारिणीत स्थान दिलेल्या अनेकांनी वाघ यांच्याकडे पदाचे राजीनामे सुपूर्द केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena workers resigned in nagpur political news