ऑनलाइनमुळे किरकोळ दुकानदारांचे मार्केट डाऊन; अनेकांचे व्यवसाय बंद; वैयक्तिक संबंधाचा मात्र फायदा

मंगेश गोमासे 
Thursday, 24 September 2020

ऑनलाइन बाजाराला सध्या तरुणाईची पसंती आहेत. कोविडमुळे याचे महत्त्व आता सर्वांनाच पटू लागले आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक तुटल्याने किरकोळ व्यावसायिक ऑनलाइन बाजाराशी जुळवून न घेता विरोधच करीत आहे.

नागपूर : एकेकाळी आमची कुठेही शाखा नाही.. हे अभिमानाने व्यावसायिक सांगत होते. मात्र ऑनलाइन शॉपिंगने सर्वांचेच गणित बिघडले आहे. ज्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले नाही त्यापैकी अनेक किरकोळ व्यावसायिकांची दुकाने अलीकडच्या काळात झपाट्याने बंद पडत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

ऑनलाइन बाजाराला सध्या तरुणाईची पसंती आहेत. कोविडमुळे याचे महत्त्व आता सर्वांनाच पटू लागले आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक तुटल्याने किरकोळ व्यावसायिक ऑनलाइन बाजाराशी जुळवून न घेता विरोधच करीत आहे. डॉ. भाग्यश्री शिरबावीकर (खटी) यांनी शहरातील बाजारांचा सर्वे केल्यानंतर किरकोळ व्यावसायिकांच्या त्रुटी समोर आल्या आहेत. ग्राहक फिरकत नसल्याने काही दुकानदारांना व्यवसाय बंद करावा लागला असेही आढळून आले. 

साधारणतः देशात २००८ पासून ऑनलाइन शॉपिंगला सुरुवात झाली. त्यावेळी किरकोळ बाजार व्यावसायिक संघटनांनी याविरोधात बरेच रान पेटविले होते. मात्र, त्यानंतरही मॉल्स आणि ऑनलाइन शॉपिंगला सुरुवात झाली. यानंतर विविध कंपन्यांनी त्यात रस दाखवीत, उडी घेतल्‍याने स्पर्धा निर्माण होऊन विविध ऑफर आणि योजना राबविण्यात आल्याने युवक आणि महिलांनी त्याला पसंती दर्शविली. यामुळे जवळपास २५ ते ३० टक्के किरकोळ व्यापाराला फटका बसला. 

अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

मात्र, हे होत असताना किरकोळ व्यावसायिकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे अपेक्षित होते. याबाबात डॉ. रिता सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात संशोधन करताना त्यांनी नागपूर शहरातील पाच मुख्य बाजारपेठा आणि जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील बाजारपेठांचा अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्या बाजारपेठांना प्रत्यक्ष भेटीही दिल्यात. 

त्यातून वाढत्या ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल संस्कृतीला आळा घालण्यासाठी, व्यवसायवृद्धी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बाजारपेठेतील दुकानदारांनी नवीन तंत्रज्ञान व मार्केटिंग वापर करणे गरजेचे होते. मात्र, या व्यावसायिकांना ते जमलेच नसल्याचे दिसून आले.

संशोधनातील तथ्य

डॉ. भाग्यश्री शिरबावीकर (खटी) यांनी सादर केलेल्या ‘ए स्टडी ऑन मार्केटिंग आस्पेक्ट्स इन रिटेल सेक्टर विथ स्पेशल रेफरन्स टु नागपूर डिस्ट्रीक्ट २००१-२०१२‘ या विषयावर शोधप्रबंधात त्यांनी बऱ्याच तथ्याचा समावेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने किरकोळ बाजारातील दुकानदारांना पैशाची अडचण, अशिक्षितपणा, जुन्या चालीरीतींनुसार व्यवसाय करणे, मार्केटिंग प्रणालीचा अभाव, नवीन उत्पादन निर्माण करण्याची हिंमत नसणे आदींचा समावेश आहे. सध्याही किरकोळ बाजारात हीच परिस्थिती आहे.

गावाकडील परिस्थिती आणखीच खराब

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील दुकानदारांची परिस्थिती अधिकच खराब आहे. अशिक्षितपणा आणि तंत्रज्ञानामुळे त्‍यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

कडकनाथ कोंबडी खाल्ली का? होमिओपॅथी आणि मानसिक विकारासाठी होतोय वापर!

ग्राहकांशी संबंध महत्त्वाचे

किरकोळ बाजारात ज्या दुकानदारांचे ग्राहकांशी संबंध चांगले आहेत, त्याच दुकानदारांना आजही कुठला त्रास झाला नसल्याचे संशोधनात दिसून आले. मात्र, नव्याने सुरू झालेली अनेक दुकानदारांचे ग्राहकांशी संबंध चांगले नसल्याने त्यांची दुकाने काहीच दिवसात बंद झालीत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shops business are down due to online shopping sites