
घरीच चहा तयार करून शासकीय कार्यालयात व खासगी ठिकाणी पोहोचून देण्याचे काम सुरू झाले. चहाची चव चांगली असल्याने मागणी वाढू लागली. चहात गुणवत्ता व घरपोच सेवा मिळत असल्याने शासकीय, खासगी व इतर ठिकाणाहून चहाची मागणी वाढली. दिवसाला ५०० कप चहाची विक्री होऊ लागली.
नागपूर : कोरोना विषाणूमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कित्येक जणांना रोजगार गमवावा लागला. भविष्याची चिंता करता करता अनेकजण नैराश्यात गेले. इतक्या कठीण काळातही पराये बंधू यांनी संकटाला संधीत रूपांतरित करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. पराये भावंडांनी कोरोना काळात चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या ‘एक्सप्रेस’ चहाने कळमेश्वरकरांना चांगलीच भुरळ घातली आहे. चहा विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला हजारोंची उलाढाल होत आहे. या चहाचे ब्रँडिंग करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
भारत पराये (वय २३) व ऋतिक पराये (वय २०) हे दोघे भावंड. कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी फाटा येथील रहिवासी. घरी शेती नाही. भारतने वाणिज्य शाखेतून पदवी तर ऋतिकने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. वडिलांचे निधन झाल्याने घरात कमावणारे कुणीच नाही. यामुळे शिक्षण सोडून स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा निर्णय दोघांनी घेतला. परंतु, त्यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा प्रश्न होता. त्यामुळे सुरुवातीला थोडे भांडवल उभे केले.
अर्थात तुटपुंज्या भांडवलातून मोठा व्यवसाय सुरू करणे शक्यही नव्हते. त्यामुळे चहाविक्री हा सुलभ आणि भविष्यात विस्तार होऊ शकणारा व्यवसाय सुरू करावा, असे भारतला वाटले. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्व बंद असताना चहा विक्रीचा निर्णय घेतला. त्यासाठी धाकटा भाऊ ऋतिकची मदत घेतली.
घरीच चहा तयार करून शासकीय कार्यालयात व खासगी ठिकाणी पोहोचून देण्याचे काम सुरू झाले. चहाची चव चांगली असल्याने मागणी वाढू लागली. चहात गुणवत्ता व घरपोच सेवा मिळत असल्याने शासकीय, खासगी व इतर ठिकाणाहून चहाची मागणी वाढली. दिवसाला ५०० कप चहाची विक्री होऊ लागली. यातून दोघेही भाऊ महिन्याला हजारोंची उलाढाल करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात दिवसाला तीन हजार रुपये कमावल्याचे पराये भावंडांनी सांगितले.
अधिक वाचा - गोष्ट बुटक्यांच्या डोंगराएवढ्या लग्नाची; नवरीची पाठवणी करताना रडलं अख्खं गाव
चहा पिण्यासाठी ग्राहकाला प्रत्येकवेळी यावे लागू नये म्हणून पराये भावंडांनी व्हॉटस्ॲपवर ऑर्डर घेण्याची सोय केली. ही कल्पनाही येथील ग्रामस्थ, परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे बसल्याबसल्या अनेकांच्या चहाच्या ऑर्डर ॲपवर मिळू लागल्या आहेत.
प्रयोग म्हणून झालेली सुरुवात यशस्वी ठरल्यानंतर पराये भावंडांना चहाचे ब्रँडिग करायचे आहे. काही रक्कम जमा झाल्यानंतर हॉटेल थाटण्याचाही त्यांचा मानस आहे. दोघा भावंडांनी कळमेश्वर येथे सुरू केलेल्या व्यवसायाची फ्रेंचायजी सावनेर येथील मित्रांना दिली आहे. सावनेरमध्ये सुध्दा मित्रांच्या माध्यमातून व्यवसाय वाढवित आहे.
जाणून घ्या - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: पुणे पोलिस चौकशीसाठी यवतमाळमध्ये दाखल; सत्य समोर येणार?
चहा विक्रीत दिलसा स्कोप
कंपनीत नोकरी केली असती तर महिन्याला ठरावीक पगार मिळाला असता; पण तसे न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असे ध्येय होते. चहा विक्रीत स्कोप दिलसा. शिवाय चहा बनविण्याची आवड लहानपणापासून होतीच. ती कामी आली. ग्रामीण भागात घरपोच, चांगली आणि सुरक्षित सेवा देत असल्याने या चहाचे ‘एक्सप्रेस’ असे नाव ठेवले आहे. चव चांगली असल्याने मागणी वाढली आहे.
- भारत पराये,
युवक, ब्राह्मणी फाटा
संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे