आता तलाव होणार झटपट प्रदूषणमुक्त! नागपूरच्या सहा विद्यार्थ्यांनी तयार केले सोलर उर्जेवर चालणारे खास यंत्र

केवल जीवनतारे
Monday, 12 October 2020

या यंत्राचा प्रयोग त्यांनी महाविद्यालयात यशस्वी केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यासाठी सोनेगाव किंवा फुटाळा तलावात चाचणी करण्याचे निश्चित झाले होते.

नागपूर ः गावखेड्यातील तलाव असो की, शहरातील. प्लास्टिक, निर्माल्य, बूट, चपलांपासून अगदी दप्तरांपर्यंत प्रत्येक गोष्ट लोकांनी या तलावाच्या हवाली केलेली आपल्याला दिसते. त्या कचऱ्यामुळे जलप्रदूषण होते. हे प्रदुषण रोखण्यासाठी तलावाची स्वच्छता अवघ्या तास दोन तासात करता येईल. यासाठी सोलरवर चालणारं यंत्र नागपुरातील काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. 

या यंत्राचा प्रयोग त्यांनी महाविद्यालयात यशस्वी केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यासाठी सोनेगाव किंवा फुटाळा तलावात चाचणी करण्याचे निश्चित झाले होते. परंतु लॉकडाउनमुळे प्रतिक्षा आता करावी लागत आहे. विशेष असे की, रिमोटद्वारे या यंत्राला तलावाच्या बाहेरून नियंत्रित करता येते.

ठळक बातमी - ‘मुलाचा अपघात झाला, किती जखम झाली, पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही’; भीक मागण्याची नवी पद्धत

हिंगणा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या मेकॅनिकल शाखेच्या सहा विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला. या विद्यार्थ्यांची नावे करण बागडे, प्रणित देवते, तन्मय रेवतकर, भार्गव जवसे, प्रवीण धकिते, प्रसाद औरंगाबादकर अशी आहेत. प्रोफेसर आलोक नारखेडे यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला आहे. अवघ्या व२० ते २५ दिवसांमध्ये हे यंत्र या विद्यार्थ्यांनी तयार केले.

असे आहे यंत्राचे काम 

या यंत्राद्वारे कचरा उलचण्याची सोपी पद्धत विकसित केली आहे. सोलर उर्जेवर चालणारे हे यंत्र तलावात सोडण्यात येते. या यंत्राला ट्यूब लावण्यात आले आहेत. यामुळे हे यंत्र पाण्यावर तरंगते. बाजुला गाईड वेज लावण्यात आले आहेत. यामुळे तलावात पसरेला कचरा जवळ आणला जातो. यानंतर कचरा येथील कापडी (नेट) बास्केटमध्ये गोळा होतो. उचललेला कचरा पुन्हा खाली पडणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी नेटचा कापड लावण्यात आला आहे. हे यंत्र तयार करण्यासाठी वीस ते पंचेविस हजार रुपयचा खर्च आला. 

वारंवार तलाव स्वच्छ करता येणार 

वाऱ्याने आणलेली पाने, छोटे आणि मोठे प्लास्टीक, भंगार. लहान जैविक कचरा, वनस्पतींचे भाग, कीटक, सूक्ष्मजीव आणि, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, सणासुदीच्या दिवसात टाकलेले निर्माल्य तलावात साठवले जाते. हा कचरा उचलण्यासाठी पुर्वी तलावाच्या किनाऱ्यावर आलेला कचरा मेहनत करावी लागत होती. मजूर लावावे लागत होते. किनाऱ्यावर सुमारे साडे पाच फुटांचा कचऱ्याचा ढिगारा साचत होता. मात्र या यंत्राद्वारे ढिगारा साठवला जाणार नाही. 

यंत्र थेट कचरा टाकण्यासाठी बाहेर नेता येते. या यंत्रामुळे तास-दोन तासात कचरा काढता येईल. साफसफाईसाठी यंत्राचा वापर केल्याने आपल्याला तलाव उत्कृष्ट स्थितीत ठेवता येतो. वारंवार तलाव स्वच्छ केल्याने पाणी स्वच्छ राहिल, जलजन्य रोग टाळता येतील. जलाशयाची स्वतंत्र साफसफाई केल्याने अतिरिक्त खर्च लागत नाही. पर्यावरण जपण्यास मदत होईल.

उत्कृष्ट पेपर म्हणून गौरव

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या आयसीजीईएसडी या आंतरराष्ट्रीय परिषदेत तलाव स्वच्छ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्राला उत्कृष्ट शोध प्रबंध म्हणून गौरव करण्यात आला आहे. २८ आणि २९ फेब्रूवारीला नागपुरात ही परिषेद झाली होती.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

सोनेगाव किंवा फुटाळा तलावात चाचणी 

या एका यंत्राच्या माध्यमातून आजुबाजुच्या परिसरातील तालुक्यात असलेल्या तलावाची स्वच्छता करण्यासाठी हे यंत्र भाड्याने देता येऊ शकेल असा विश्वास प्रणित देवते यांनी व्यक्त केला. महापौर संदीप जोशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. या प्रकल्पाची चाचणी सोनेगाव किंवा फुटाळा तलावात करण्यात येईल. यानंतर पेटंटसाठी टाकता येऊ शकेल असे विद्यार्थी बोलून गेले.

संपादन - अथर्व महांकाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Engineering students in Nagpur made machine which clean lakes