ऐका हो ऐका, यावर्षी कापसाला "बायबाय'; सोयाबीनला "वेलकम'; काय आहे कारण....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

लॉकडाउनमुळे कपाशीचे मातीमोल झालेले भाव व विक्रीकरिता येत असलेल्या अडचणीमुळे येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरी पांढऱ्या सोन्याकडे पाठ फिरविणार आहे. यामुळे नरखेड तालुक्‍यात कपाशीचा कमी होऊन सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तविला आहे.

नरखेड (जि.नागपूर)  :  कोरोना विषाणू संसर्ग, लॉकडाऊन याचा परिणाम या हंगामात पीक पद्धतीवर दिसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेरणीपूर्व मशागत संपली असून शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन सुरू आहे. लॉकडाउनमुळे कपाशीचे मातीमोल झालेले भाव व विक्रीकरिता येत असलेल्या अडचणीमुळे येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरी पांढऱ्या सोन्याकडे पाठ फिरविणार आहे. यामुळे नरखेड तालुक्‍यात कपाशीचा कमी होऊन सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा  : अरे जरा ऐका रे ! होमक्‍वारंटाइन केलेल्यांनी उडविली प्रशासनाची झोप, मग प्रशासनाने केला उपाय....

यंदा खरीपात सोयाबीनचा पेरा वाढणार
नरखेड तालुक्‍यात513हजार दोनशे दहा हेक्‍टर क्षेत्र पेरनियोग्य आहे. गेल्या हंगामात कपाशी30 हजार पाचशे सोळा, सोयाबीन 7 हजार नऊशे सत्तेचाळीस, तूर6 हजार नऊशे एकोणनव्वद, मक्का 1 हजार पाचशे एकोणऐंशी, ज्वारी एक हजार एकशे सहासष्ट हेक्‍टर पेरा होता. मूग, उडीद, भुईमूग, तीळ, मिरची, हळद ,ऊस, इतर कडधान्य व गळीत धान्याचा एक हजार हेक्‍टरमध्ये पेरा होता.

सोयाबीनच्या पेऱ्यात साठ टक्के वाढ
मार्चमध्ये लॉकडाउन झाल्यापासून तालुक्‍यात कापूस खरेदी बंद होती. त्यामुळे आजही अनेक शेतकऱ्याकडे कापूस तसाच पडून आहे. खाजगी कापूस खरेदीदार पडल्या भावाने कापूस खरेदी करीत आहे. सीसीआय व कापूस पणन महासंघाकडून कापूस खरेदी सुरू आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्याकडे असलेल्या कापसाच्या प्रमाणात होत असलेली खरेदी खूप संथ गतीने होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी निराश होऊन सोयाबीनकडे वळला आहे. तालुक्‍यात सोयाबीनच्या पेऱ्यात साठ टक्के वाढ होण्याची शक्‍यता शेती तज्ञ व कृषी केंद्र संचालक अविनाश गावंडे यांनी व्यक्त केली .

हेही वाचाः परवा प्रीतेश गेला, काल दत्तू...दोन्ही कामगारांच्या मृत्यूने कुटुंबीयांचे दुःख अनावर , मृत्यूचे कारण...

300मेट्रिक टन खत पुरवठ्याचे उद्दिष्ट्य
गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी बॅंकेमार्फत पीकविमा काढला होता. ज्यांचे नुकसान झाले अश्‍याना अजूनपर्यंत विम्याची रक्कम नाही मिळाली. कित्तेक शेतकऱ्यांकडुन विम्याचे पैसे वसूल केल्या नंतर बॅंकेने ते विमा कंपनीत जमाच नाही केले किंवा शेतकऱ्यांनाही परत नाही केले. अशी अनेक प्रकरणे तालुक्‍यात आहेत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर खतपुरवठा योजना आहे. त्याअंतर्गत तालुक्‍यात20 मेट्रिक टन खत पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये डी ए पी,10-26-10 या संयुक्त खताचा समावेश आहे. 300मेट्रिक टन खत कृषी विभागाकडून पुरवठ्याचे उद्दिष्ट्य आहे.

संत्रा आंबिया बहार गळतीमुळे शेतकरी चिंतातूर
यावर्षी संत्र्याच्या आंबिया बहाराची चांगल्या प्रकारे फूट झाली होती. शेतकऱ्यांनीही आंबिया बहारावर खूप खर्च केला. परंतु नैसर्गिक वातावरणाच्या बदलामुळे आलेला पूर्ण बहार गळून पडला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आता संत्रा बहारावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. आंबिया बहाराला विमा कवच असावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

बियाण्यांची उगवण क्षमता तपासा
लॉकडाउनमुळे सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे. तसेच बियान्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. किटकनाशकाचा खर्च कमी करण्याकरिता निंबोणीच्या अर्काची फवारणी करावी.
डॉ.योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean sowing will increase in kharif this year