थकबाकीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब आक्रोश

योगेश बरवड
Monday, 9 November 2020

इमामवाडा येथील एसटी कर्मचारी गाळ्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी एकत्र येत निदर्शने केली. सरकारने कामगारांची हलाखीची स्थिती लक्षात घेत तातडीने सर्वप्रकारची थकबाकी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

नागपूर  ः कोरोनाच्या संकटकाळात जोखीम स्वीकारून सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. थकित वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस मिळावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी राज्यभरात सहकुटुंब आक्रोश केला. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या हाकेवर हे आंदोलन करण्यात आले. शहरातील कामगारांनी त्यांच्या घरापुढे कुटुंबासह आंदोलन केले. इमामवाडा येथील एसटी कर्मचारी गाळ्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी एकत्र येत निदर्शने केली. सरकारने कामगारांची हलाखीची स्थिती लक्षात घेत तातडीने सर्वप्रकारची थकबाकी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

क्लिक करा - सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा ‘सन्मान’; तुमचा तर यात समावेश नाही ना
 

कोरोना काळात जबाबदारी सांभाळताना अनेक कर्मचाऱ्यांना विषाणूची बाधा झाली. राज्यात ७३ कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. परंतु, अनेकांच्या कुटुंबीयांना विमा कवचाची ५० लाखांची मदतही प्रशासनाने दिली नाही. कोरोना काळात महामंडळाचे उत्पन्नच बुडाले. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. तीन महिन्यांचे वेतन थकल्याने अडचणींचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्‍त्र उगारले.

कामगारांच्या दबावासमोर प्रशासन नमले. मात्र, केवळ एका महिन्याचेच वेतन देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. आता पुन्हा तीन महिन्याचे वेतन महामंडळाकडे थकले आहे. वैफल्यग्रस्त कर्मचारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यानंतरही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये रोष उफाळून आला आहे. दिवाळीपूर्वी वेतन न दिल्यास कामगार कायदा व वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याप्रकरणी औद्योगिक न्यायालयात दावा ठोकण्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला.

आंदोलनात एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले, विभागीय अध्यक्ष प्रशांत बोकडे, विभागीय कार्याध्यक्ष जगदीश पाटमासे, रवी सोमकुवर, प्रशांत उमरेडकर, प्रदनाकर चांदनखेडे, मोहम्मद इम्रान, माधुरी ताकसांडे, मनोज बगले, एन. डी. गणेश, प्रमोद बिडकर, गणेश मेश्राम, मोहम्मद आरीफ, गजू शेंडे, योगेश उकंडे, मनोज श्रीवास्तव आदी सहभागी झाले होते.

कर्मचारी आत्महत्येच्या घटनेचे पडसाद

एसटीचे रत्नागिरी येथील चालक पांडुरंग गडदे व जळगाव आगारातील वाहक मनोज चौधरी या दोघांनीही आज गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांचे पडसाद आजच्या आंदोलनात उमटले. कामगारांनी तीव्र घोषणा देत शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध नोंदविला. 

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers agitation with family for arrears demand