esakal | "निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न" : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

state government is trying mute arnab goswami said chandrakant patil

आज सकाळी येथील शुक्रवारी तलाव परीसरातील टिळक पुतळ्याजवळ राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केल्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत चंद्रकात पाटील बोलत होते.

"निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न" : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर ः रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा भ्याड प्रयत्न आहे, अशी टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज येथे केली. अर्णब गोस्वामी आज जात्यात आहेत, पण तुम्ही सुपात आहात, असेही श्री पाटील नागपुरातील पत्रकारांना उद्देशून म्हणाले.

आज सकाळी येथील शुक्रवारी तलाव परीसरातील टिळक पुतळ्याजवळ राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केल्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत चंद्रकात पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, परिणय फुके, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते. 

क्लिक करा - ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता 

चंद्रकांत पाटील म्हणाले, आज सकाळी सुरू झालेले आंदोलन अर्णब गोस्वामीची सुटका होईपर्यंत सुरूच राहणार आहे. असंगाशी संग केल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्वही वाया चालले आहे. दिल्लीतून आलेल्या दबावामुळे उद्धव ठाकरे सरकारने गोस्वामींवर अशा प्रकारे सुडाची कारवाई केली. आज केलेली कारवाई पूर्णपणे राजकीय पोळी शेकण्यासाठी केली आहे. घरातून फरफटत नेणे हा पत्रकारावर झालेला अन्याय आहे आणि भाजप कुठलाही अन्याय सहन करत नाही, करणारही नाही.

अचानक निवडणुकीची घोषणा 

नागपूरात एका पत्रकाराच्या वडीलांचा रुग्णालयात मृत्यू झाला. यामध्ये रुग्णालय प्रशासनाचा दोष असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती नाही. पण हा सुद्धा पत्रकारावरील अन्यायच आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांना या प्रकरणात लक्ष घालायला सांगितले आहे. पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम ४५ दिवसांचा द्यावा लागतो. यावेळी अचानक निवडणुकीची घोषणा करून २५ दिवसांचा कार्यक्रम देण्यात आला आहे. याबाबतीत निवडणूक विभागाला आम्ही निवेदन दिले आहे. बाकी येत्या दोन दिवसांत निवडणुकीसाठी उमेदवार आणि इतर बाबींचा निर्णय घेऊ, असे श्री पाटील म्हणाले.

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

सरकारची वाटचाल बघून आणीबाणीची आठवण

कांजूरमार्ग मिठागर नष्ट करणे म्हणजे तो सुद्धा पर्यावरणासाठी धोकादायकच आहे. यासाठीही आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत. सरकारची वाटचाल बघून आणीबाणीची आठवण येत आहे. समीर ठक्करने समाजमाध्यमावर विचार व्यक्त केले होते. तर त्याला आतंकवाद्यांसारख रस्त्यांवरुन फिरवण्यात आले. सरकारची कार्यपद्धती बघून राज्यात ठोकशाही चालली आहे, असेच म्हणावे लागेल. याशिवाय वाढीव वीज बिलासारखे अनेक प्रश्‍न राज्यातील जनतेला भेडसावत आहेत. या सर्व प्रश्‍नांवर आम्ही लढा देणार आहोत, असे चंद्रकात पाटील म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ