नागपूर विद्यापीठाचे ‘मिशन काश्मीर' यशस्वी; राजस्थान, हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी दिला विद्यापीठाचा पेपर

मंगेश गोमासे 
Sunday, 18 October 2020

विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिल्याने विद्यापीठाचे मिशन काश्मीर यशस्वीरित्या पार पडले. याशिवाय राजस्थान आणि हरियाणातील विद्यार्थ्यांनी सुरळीतरित्या ऑनलाईन परीक्षा दिली आहे.

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत पहिल्या दिवशीपासून तांत्रिक समस्येचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विद्यापीठाची नाचक्की होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसापासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत झाल्या असून आज चक्क विद्यापीठाने जम्मु काश्मीरच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिल्याने विद्यापीठाचे मिशन काश्मीर यशस्वीरित्या पार पडले. याशिवाय राजस्थान आणि हरियाणातील विद्यार्थ्यांनी सुरळीतरित्या ऑनलाईन परीक्षा दिली आहे.

विद्यापीठात बीपीई आणि बीपीएड या परीक्षेसाठी अनेक राज्याबाहेरील विद्यार्थी शिकायला येत असतात. यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हे विद्यार्थी आपापल्या राज्यात निघून गेले. मात्र, मार्चनंतर लॉकडाऊन लागल्याने विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत येता आले नाही. 

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

त्यामुळे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेत असताना, देशातील विविध राज्यात वास्तव्यास असलेले विद्यार्थी कशी परीक्षा देतील असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेशपत्र मिळालेले नव्हते. 

जम्मु काश्मीर, राजस्थान, हरियाणा या राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल का? हा प्रश्न निर्माण झाला होता. यावर विद्यापीठाने मार्ग काढून या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली. ऑनलाईन प्रवेशपत्र पाठवित परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. यातून आज विद्यापीठाच्या बीपीई आणि बीपाएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. यावेळी बीपीईमध्ये ८११ पैकी ८०० तर बीपाएड अभ्यासक्रमात ८४३ पैकी ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात सर्वाधिक जम्मु काश्मीरमध्ये बीपीईचे २७० तर बीपाएड अभ्यासक्रमात ३३६ विद्यार्थी होते.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या​

२४ हजारावर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

विद्यापीठाद्वारे आज २५ हजार ३५८ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी २४ हजार ८९० (९८.१५) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये सर्वाधिक वाणिज्य शाखेत १२ हजार १७५ पैकी ११ हजार ९८२ (९८.४१) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याशिवाय विज्ञान शाखेत ९ हजार १० पैकी ८ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी (९६.९४), आंतरशाखीय शाखेत २,९७० पैकी २,८७९ (९८.३९)तर फॉर्मसी शाखेत १,२०३ पैकी १,१६४ (९६.७६) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students from haryana and rajsthan gave RTMNU paper successfully