विद्यार्थ्यांनो, शिका आणि कमवासुद्धा 

मंगेश गोमासे
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

विद्यार्थ्यांसाठी "टिस्स' आणि ल्युपिन फार्मा कंपनीने पुढाकार घेत, शिक्षण घेत असताना, विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. 

नागपूर : आर्थिक अडचणीमुळे बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे पुढचे शिक्षण घेणे कठीण होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी नोकरी करण्याची वेळ येते. अशा विद्यार्थ्यांसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस्स) आणि ल्युपिन फार्मा कंपनी यांच्या "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी'अंतर्गत (सीएसआर) सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट (सीआयबीएमआरडी) येथील केंद्रात नव्या पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकता-शिकता प्रत्येक महिन्याला विद्यावेतनही मिळेल. 

देशात दहावीनंतर मुलींचे आणि बारावीनंतर मुलांच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण मोठे आहे. या गळतीमागे आर्थिक परिस्थिती जेमतेम असणे, हे मुख्य कारण आहे. त्यामुळे मनात शिकण्याची इच्छा असली तरी, घराचा गाडा ओढण्यासाठी शिकण्याऐवजी नोकरीच करावी लागते. त्यामुळे शिक्षणाची इच्छा मनातच राहून जाते. मात्र, अशा विद्यार्थ्यांसाठी "टिस्स' आणि ल्युपिन फार्मा कंपनीने पुढाकार घेत, शिक्षण घेत असताना, विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. 

हेही वाचा - तुम्ही बेरोजगार आहात? सावध राहा
 

या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळाची मान्यताही आहे. असाच "बी.व्होक इन फार्मास्युटिकल मॅनिफॅक्‍चरिंग' हा तीन वर्षीय अभ्यासक्रम सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट या महाविद्यालयात सुरू करण्यात येत आहे. अभ्यासक्रमात आठवड्यातून पाच दिवस थेट कंपनीत प्रशिक्षण आणि एक दिवस महाविद्यालयात "थेअरी' शिकविण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला 8 हजार, द्वितीय वर्षात 9 हजार आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना 10 हजार प्रतिमहिना विद्यावेतन देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात प्रवेशासाठी 800 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी जवळपास 57 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. येत्या शुक्रवारपासून (ता.3) या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येईल. 
 

भविष्यात अनेक संधी
 होतकरू विद्यार्थ्यांना शिकता-शिकता त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा या उद्देशाने नवा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. "टिस्स' आणि "ल्युपिन'च्या सामाजिक दायित्वातून हा अभ्यासक्रम सुरू होणार असून भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक संधी निर्माण होईल. 
डॉ. आमिषी अरोरा, 
प्राचार्य, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students, learn and even earn