हुश्श! यंदाचा उन्हाळा गाठणार म्हणे पा-याचा उच्चांक

heat-wave
heat-wave

नागपूर : नागपूरची संत्री, सावजी व तर्री पोहे जेवढे देशात प्रसिद्ध आहेत, तेवढाच इथला उन्हाळाही. विदर्भात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादा पाहुणा आला आणि उन्हाचे चटके झोंबले की नक्कीच त्याच्या तोंडून 'बापरे बाप, किती हा ताप' असे शब्द निघाल्याशिवाय राहणार नाही. यंदा ऊन पावसाच्या खेळामुळे आतापर्यंत खरा उन्हाळा जाणवला नसला तरी, लवकरच ऊन वैदर्भीयांची झोप उडवणार हे निश्चित आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पारा 45-46 डिग्रीवर गेल्याशिवाय वैदर्भीयांना उन्हाळा आल्यासारखे वाटतच नाही. मात्र यावेळी मे महिना उजाडला तरीसुद्धा विदर्भात अद्याप पारा 45 डिग्रीवर पोहोचला नाही, याचे साऱ्यांनाच नवल वाटत आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितल्यास यंदा असे पहिल्यांदाच घडले. हवामान विभागाचे अधिकारीही ही बाब मान्य करतात. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सातत्याने तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे सारखे वातावरण बदलत आहे. त्यामुळेच यावेळी एप्रिलमध्ये पारा एकदाही पंचेचाळीशी पार करू शकला नाही. गेल्या महिन्यात सरासरी तापमान 40.1 इतकेच राहिले. उल्लेखनीय म्हणजे, मागील पाच वर्षांमध्ये (2015 नंतर) प्रथमच इतक्या कमी सरासरी तापमानाची नोंद करण्यात आल्याचे हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी सांगितले. पण त्याचवेळी हा वातावरणातील बदल किंवा 'ग्लोबल वॉर्मिंग'चा परिणाम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, दरवर्षीच अधूनमधून कमी दाबाचे पट्टे तयार होऊन विदर्भात वादळ किंवा अवकाळी पाऊस येत असतो. यावेळी हे प्रमाण थोडे जास्त आहे एवढेच.  भविष्यातही ती शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये  मॉन्सूनची 'एन्ट्री' झाल्यापासून यंदा वरूणराजाने उसंतच घेतली नाही.   
सात वर्षांपूर्वी चंद्रपूरने गाठले होते 48.2 डिग्री तापमान  
विदर्भातील तापमानाच्या आकड्यांबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. आतापर्यंत अनेकवेळा विदर्भातील तापमानाने देशात नवनवे उच्चांक नोंदविले आहे. सात वर्षांपूर्वी म्हणजेच 22 मे 2013 रोजी चंद्रपूरचा पारा तब्बल 48.2 डिग्रीवर गेला होता. विदर्भाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील तो सर्वात उष्ण दिवस ठरला होता. त्याच्या एक दिवसानंतर (23 मे 2013 रोजी) नागपुरातही कमाल तापमानाने 47. 9 चा उच्चांक गाठला होता. या दोन्हीही दिवशी चंद्रपूर व नागपुरात अगदी संचारबंदीसदृश वातावरण होते. उन्हाने पशूपक्षीदेखील भाजले होते. गतवर्षीही नागपूरच्या पाऱ्याने 47.5 पर्यंत झेप घेतली होती. 

ऊन असो, पाऊस असो किंवा हिवाळा. विदर्भात नेहमीच इतर ठिकाणांपेक्षा अधिक  असतो. इथल्या घाम फोडणा-या उन्हाची सर्वत्र चर्चा होत असतानाच पावसानेही अनेकवेळा आपला रंग दाखविला आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या वेळी नागपुरात 24 तासांत तब्बल सव्वा तिनशे मिलिमीटर पाऊस बरसला होता. जुलै महिन्यातील 'त्या' धुवांधार पावसाने अधिवेशनासाठी आलेली नेते मंडळीही अवाक झाली होती. विदर्भातला हिवाळाही कमी नाही. गेल्या वर्षी 29 डिसेंबरची कडाक्याच्या थंडीची रात्र कुणीच विसरू शकत नाही. त्या रात्री नागपूरच्या पाऱ्याने शतकातील सगळ्यात कमी म्हणजे 3.5 डिग्री इतका नीचांक गाठला होता. उल्लेखनीय म्हणजे, 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागपुरात मुक्कामी असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनाही नागपूरी गारठ्याने चांगलीच हुडहुडी भरविली होती. मि. बच्चन यांनी स्वतः ट्विटरवरून ट्विट करून थंडीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.                                                                                                                                                                                                                                                                                        

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com