रविवार ठरला अपघातवार, दाम्पत्यासह सहा जण ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

सुसाट वेगात असलेली मोटरसायकल अनियंत्रित झाली, भिंत तोडून ती थेट नाल्यात पडली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार झालेत.

नागपूर : वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील "संडे एंजॉय' करण्याचा बेत सुरू असतानाच शहराच्या विविध भागांत झालेल्या अपघातामुळे रविवार अपघातवार ठरला. दुचाकीने जाणारे युवा दाम्पत्य आणि दोन विद्यार्थ्यांसह सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांचा जीवनमृत्यूशी संघर्ष सुरू आहे. जखमींमध्ये दोन चिमुकल्या मुलांचाही समावेश आहे. 

पहिली घटना शनिवारी रात्री भिवसनखोरी मार्गावरील वायुसेनानगर प्रवेशद्वाराजवळ घडली. सुसाट वेगात असलेली मोटरसायकल अनियंत्रित झाली, भिंत तोडून ती थेट नाल्यात पडली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार झालेत. रजत पुरुषोत्तम मोहरकर (वय 25) व अक्षय गोपाल डुकरे (वय 23, दोन्ही रा. अमर आश सोसायटी), अशी मृतांची नावे आहेत. रजत हा बीएसस्सीला शिकत होता. अक्षयही शिक्षण घेत होता. 

शनिवारी रात्री दोघेही (एमएच-49-ए-1458) या क्रमांकाच्या मोटरसायकलने भिवसनखोरी येथे गेले. जेवन करून ते मोटरसायकलने जात होते. वायुसेनानगर भागात चालकाचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले. भिंती तोडून मोटरसायकल वायुसेनानगर प्रवेशद्वाराजवळील नाल्यात पडली. जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. एका नागरिकाला मोटरसायकलचा लाईट दिसला. तो नाल्याजवळ गेला. दोन युवक जखमी अवस्थेत असल्याचे त्याला दिसले. नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. 

नियंत्रण कक्षाने गिट्टीखदान पोलिसांना कळविले. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक एम. जे. राठोड यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोघांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासून रजत व अक्षयला मृत घोषित केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 

क्लिक करा - व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी

दुसरी घटना उमरेड मार्गावरील विहीरगावजवळील उड्डाणपुल भागात रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. मोहाडी येथील सुरेश रुपराव चौधरी (वय 30), त्यांच्या पत्नी शीतल (वय 25) व अडीच व चार वर्षांचे दोन अपत्ये मोटरसायकलने नागपूरकडे येत होते. उड्डाणपुलाजवळ यु-टर्न घेणाऱ्या दहा चाकी ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. दोन्ही मुले बाजूला फेकल्या गेले तर सुरेश व शीतल ट्रकच्या चाकाखाली आले. सुरेश व शीतल यांचा मृत्यू झाला. सुदैवाने मुले किरकोळ जखमी झाले. 

अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे. तिसरी घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. हरिदास भय्यालाल धिचरिया (वय 65 ,रा. कामगारनगर कॉलनी) हे दुचाकीने काटोलहून नागपूरला येत होते. दाभा भागात त्यांचा अपघात झाला. पोलिसांनी हरिदास यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौथी घटना धंतोलीतील नरेंद्रनगर पुलाजवळ घडली. मोटरसायकलच्या अपघातात शब्बीर खान रमजान खान (वय 50, रा. मोठा ताजबाग) यांचा मृत्यू झाला तर तन्वीर शब्बीर खान हा जखमी झाला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday accident kills six, including couple