हिंगण्यानंतर आता कामठीतही शिक्षकांवर फौजदारीचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

निवडणुकीसारखे राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या कामाला शिक्षकांनी "गुडबाय' केले. ही बाब कामठी तहसील प्रशासनाने चांगलीच मनावर घेतली. जवळपास 230 शिक्षकांवर कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.

नागपूर/कामठी : मतदारयाद्या "अपडेट' करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु, निवडणुकीसारखे राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या कामाला शिक्षकांनी "गुडबाय' केले. ही बाब कामठी तहसील प्रशासनाने चांगलीच मनावर घेतली. जवळपास 230 शिक्षकांवर कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. यानुसार तहसीलदार अरविंद हिंगे यांनी या सर्व 230 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 24 तासांच्या आत या नोटीसवर उत्तर न आल्यास कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

क्‍लिक करा : सहलीवरून परतताना घनदाट जंगलात बंद पडली विद्यार्थ्यांची एसटी, वाचा ही थरारक कहाणी

निवडणूक कामाची अवहेलना करण्याचा आरोप

निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्या "अपडेट' करण्याचे काम बीएलओमार्फत करण्यात यावे, असे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार तहसीलदार अरविंद हिंगे यांनी बीएलओ म्हणून तालुक्‍यातील 230 शिक्षकांची नियुक्ती केली. यासाठी काही महिन्यापूर्वी तहसीलमध्ये प्रशिक्षणसुद्धा पार पडले. हे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शवून प्रशिक्षणाला गैरहजेरी लावली. त्यानंतर शिक्षकांनी बीएलओचे काम करणार नसल्याचे ठरविले. सद्यस्थितीत राज्य निवडणूक आयोगाकडून बीएलओच्या कामाचा आढावा घेणे सुरू आहे. कामठी तालुक्‍यात केवळ 15 शिक्षकांनी बीएलओचे काम सुरू केले. बीएलओंना मतदारयादीत नाव दुरुस्ती करणे, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांचे व्हेरिफिकेशन, मतदारांच्या घरी भेटी देणे आदींसह इतर कामांचा समावेश आहे.

क्‍लिक करा : जिल्हा परिषदेत पदांसाठी रस्सीखेच

तहसील प्रशासनाला मागीतला आढावा
राज्य निवडणूक आयोगाने बीएलओंच्या कामाचा आढावा तहसील प्रशासनाला मागितला. त्यांची कामे थंडबस्त्यात असल्याने निवडणूक आयोगाला काय माहिती द्यावी, असा प्रश्न तहसील प्रशासनाला पडला आहे. तहसीलदारांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार सुनील तरुडकर यांनी बीएलओचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 च्या कलम 32 व भारतीय दंडसंहिते 1860 च्या कलम 187,188 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The teacher still raps at work