त्या शिक्षिका नव्हे देवदूतच! सुविधा नसलेल्या महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी केली शिक्षणाची सोय 

मंगेश गोमासे
Saturday, 12 September 2020

राज्यात मार्च महिन्यात टाळेबंदीला सुरुवात झाली. या काळात महापालिकेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित होण्याची वेळ आली होती. अशावेळी शुभांगी पोहरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात केली.

नागपूर : टाळेबंदीत शाळा बंद झाल्याने महापालिकेतील विद्यार्थ्यांचे शिक्षणही बंद पडले. या प्रकाराने हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर लोटले जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, गांधीबाग महापालिका शाळेच्या शिक्षिका शुभांगी पोहरे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय करून दिली आहे.

ठळक बातमी - काय सांगता! नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास

राज्यात मार्च महिन्यात टाळेबंदीला सुरुवात झाली. या काळात महापालिकेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित होण्याची वेळ आली होती. अशावेळी शुभांगी पोहरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासाठी शुभांगी पोहरे यांनी ५० टेस्ट तयार केल्यात. या टेस्ट केवळ महापालिकेच्याच विद्यार्थ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या कामी याव्यात यासाठी 'बीपीजीईएम' या संकेतस्थळवर अपलोड केल्या. यामुळे राज्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला आहे. 

विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात सहभागी होता येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वर्कशीटच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. त्या नियमित ऑनलाइन शिक्षणाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करीत असतात. याशिवाय वर्षभर शैक्षणिक व्हिडीओ, इंटराक्टिव्ह पीपीटी, गुगल फॉर्म आणि टेस्ट मोझच्या माध्यमातून टेस्ट तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षित करीत आहे. 

केवळ शिक्षणच नव्हे तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देण्याचा उद्देशाने कार्य करीत असतात. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार, थायलंड येथे ग्लोबल बेस्ट टीचर अवार्ड मिळालेला आहे. तसेच विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या विविध सामाजिक संघटनासोबत जुळल्या आहेत.

अधिक माहितीसाठी - Video : जो सन्मान नेत्यांना मिळतो तो तुकाराम मुंढेंना मिळाला, असे क्विचतच घडते

विद्यार्थ्यांना मदत

शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी म्हणूनही शुभांगी पोहरे काम करीत असतात. विद्यार्थ्यांना पुस्तके असो वा इतर मदतीसाठी त्या सदैव तत्पर असतात. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि त्यांना आर्थिक मदत करून त्यांचे आयुष्य फुलविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यापैकी काही विद्यार्थी हे समाजात आपल्या पायावर उभे राहिले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher took good initiative to teach NMC school students