ब्रेकींग : "ते' दोघे चिमुकले गेले मौज करायला आणि घडला दुर्देैवी प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

दोन महिने लॉकडाउनमध्ये अडकून पडल्यानंतर त्या दोघांना वाटले असावे मोकळया हवेत थोडी मौज करावी. बालस्वभावानुसार स्वच्छंद जगण्याचा आनंद घ्यावा. ते दोन मित्र रानात फिरायला गेले. गावाच्या शिवारात असलेल्या रिधोरा जाम प्रकल्पातील पाणी पाहून त्यांना खूप आनंद झाला. दोघांनाही पाण्यात पोहावेसे वाटले. ते पाण्यात उतरले आणि क्षणात घडले भलतेच काही...

काटोल(जि.नागपूर) : बुधवारची सकाळ. काचारी सावंगा येथील राजेश मारोती युवनाते (वय 10) व यश दिलीप वाघाडे (10) दोघेही मित्र घरून फिरायला गेले. फिरता-फिरता त्यांना रानात जाण्याची हौस झाली. मौजमजा करीत असताना ते जाम प्रकल्पाच्या तलावाजवळ पोहचले. त्यांची पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. पोहण्याकरिता ते दोघे पाण्यात उतरले. काही क्षण पाण्यात मौज केली. त्यांना पोहण्यात मौज वाटू लागली. पोहत असताना अचानक ते खोल पाण्यात पोहोचले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडायला लागले. अखेर पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल

कपडे आढळले तलावाच्या बाजूला
इकडे संध्याकाळ झाली तरी मुले घरी आले नाही, म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना संध्याकाळी त्यांच्या अंगावरील कपडे तलावाच्या बाजूला दिसून आले. लगेच कोंढाळी
पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार श्‍याम गव्हाणेंसह सहकारी जाम प्रकल्पाजवळ पोहोचले.
घटनास्थळी पोहोचून पाण्यात शोध घेतला. काठावर पाण्यात दोघांचेही मृतदेह दिसून आले. पंचनामा
करून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली व बालकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता काटोल येथे पाठविण्यात आले.

आणखी वाचा : नागपूरच्या "लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिका-यांची शिकार

आईवडीलांनी फोडला. हंबरडाच
घटनेची माहिती गावात पसरताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दोन्ही मुले मजुरी करणाऱ्या घरातील असून, राजेश मारोती युवनाते हा आजीकडे राहत होता. मुलांची स्वच्छंद पोहण्याची इच्छा त्यांच्यासाठी काळ ठरली. त्या दोघांचे निरागस मृतदेह पाहून आईवडीलांनी तर हंबरडाच फोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They both went to have fun and the unfortunate thing happened