अचानक प्रकृती खालावल्याने चालक गेला घरी; चोरट्याने डाव साधत ४५० सिलेंडरसर ट्रक केला लंपास

अनिल कांबळे
Tuesday, 22 September 2020

याचदरम्यान त्याची प्रकृती खालावली. त्याने नितीनला संपर्क साधून प्रकृती खालावल्याची माहिती दिली. डेपोसमोरच ट्रक उभा करून राजेंद्र घरी गेला. दरम्यान, तीन चोरटे तेथे आले. त्यांनी ट्रकचा दरवाजा उघडला. जीपीएस प्रणालीचा वायर तोडला. ट्रक घेऊन चोरटे चंद्रपूरकडे पसार झाले.

नागपूर : वर्धा मार्गावरील खापरीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीसमोर ४५० सिलेंडर लादलेला ट्रक उभा केला होता. कैलाश बाबूलाल राठोड (वय ४९, रा. रतनगंज, अमरावती) हा उभा असलेला ट्रक घेऊन पसार झाला होता. चोरट्याला बेलतरोडी पोलिसांनी जाममध्ये अटक केली. त्याच्याकडून ट्रक व सिलेंडर जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मोहनराव बेलखोडे (वय ३३, रा. न्यू सुभेदार ले-आउट) याच्या मालकीचा जीपीएस असलेला ट्रक घेऊन (एमएच ३१-सीबी-७६५१) चालक राजेंद्र रमुलाल अजित हा डेपोत आला. त्याने ट्रकमध्ये ४५० सिलेंडर भरले.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

याचदरम्यान त्याची प्रकृती खालावली. त्याने नितीनला संपर्क साधून प्रकृती खालावल्याची माहिती दिली. डेपोसमोरच ट्रक उभा करून राजेंद्र घरी गेला. दरम्यान, तीन चोरटे तेथे आले. त्यांनी ट्रकचा दरवाजा उघडला. जीपीएस प्रणालीचा वायर तोडला. ट्रक घेऊन चोरटे चंद्रपूरकडे पसार झाले.

वायर तोडल्यानंतरही बारा तासांपर्यंत ट्रकची लोकेशन कळत असल्याचे चोरट्यांना माहिती नव्हते. याचदरम्यान ट्रक चंद्रपूरकडे जात असल्याचे नितीन यांना समजले. त्यांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. बेलतरोडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - प्यार दिवाना होता है! टिकटॅकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...

बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत, निरीक्षक दिलीप साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक तेजराम देवळे, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, मिलिंद पटले, बजरंग जुनघरे, कमलेश, राजेंद्र व वर्षा चंदनखेडे आदींच्या पथकाने ट्रकचा पाठलाग सुरू केला.

ट्रक जाममध्ये असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी जाममध्ये सापळा रचून कैलाश याला अटक केली. त्याच्याकडून ट्रक व ट्रकमधील ४५० गॅस सिलेंडर जप्त केले. त्याचे दोन साथीदार फरार झाले. पोलिसांनी कैलाश याला सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिस कैलाश याच्या दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested with cylinder truck