‘एपीआय’च्या पिस्टलवर वर्दीधारीने केला हात साफ; पोलिस दलात खळबळ; अनोळखी आरोपीविरुद्घ गुन्हा नोंद

सूरज पाटील
Thursday, 22 October 2020

राहुलकुमार राऊत (वय 34, रा. प्रतिबिंब अपार्टमेंट, बांगरनगर), असे पिस्टल चोरीला गेलेल्या एपीआयचे नाव आहे. ते स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्थ येत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

यवतमाळ : गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची ख्याती पोलिसांची आहे. मात्र, पोलिस वर्दीत आलेल्या एका आरोपीने चक्का सहायक पोलिस निरीक्षकाच्या घरातील सर्व्हिस पिस्टलवर हात साफ केला. ही घटना बुधवारी (ता.21) दुपारी दीड वाजता दरम्यान बांगरनगर परिसरात घडली. पोलिस अधिकार्‍याची पिस्टलच चोरीला गेल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

राहुलकुमार राऊत (वय 34, रा. प्रतिबिंब अपार्टमेंट, बांगरनगर), असे पिस्टल चोरीला गेलेल्या एपीआयचे नाव आहे. ते स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्थ येत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. प्रकृती बरोबर नसल्याने व कार्यालयीन कामानिमित्त राऊत घराबाहेर पडले होते. तर पत्नी मुलाला घेवून मंदिरात गेल्या होत्या. घरी फक्त घरकाम करणारी महिला उपस्थित होती. 

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

दुपारी एक ते दीड वाजता दरम्यान पोलिसासारखी वर्दी परिधान केलेला 50 वर्षे वयोगटातील एक व्यक्ती घरात आला. साहेब, कुठे आहेत अशी विचारणा केली. घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरचे कुलूप तोडून एपीआय राऊत यांची सर्व्हिस पिस्टल मॅग्जीन हॉलीस्टरसह शासकीय किंमत 20 हजार रुपये व दहा जिवंत काडतूस, रोख पाच हजार असा एकूण 25 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राहुलकुमार राऊत यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी आरोपीविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. 

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. आता तर, पोलिसाची वर्दी परिधान केलेला व्यक्ती अधिकार्‍याच्या घरात शिरून थेट पिस्टलवर हात साफ करतो. विशेष म्हणजे त्याच अपार्टमेंटमध्ये पुन्हा काही पोलिस अधिकार्‍यांचे वास्तव्य आहे. या घटनेमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

एसपींसह अधिकारी घटनास्थळी

एपीआयची सर्व्हिस पिस्टल चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. 

एलसीबी, डीबी पथक मागावर

पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगणार्‍या घटनेमुळे पिस्टल चोरट्याचा शोध घेणे आवश्यक आहे. स्थानिक गुन्हे शाखा, शहर डीबी पथक चोरट्याचा मागावर आहे. ‘ट्रॅक’सोडून घडलेल्या घटनाक्रमाची चर्चाही पोलिस दलात होत आहे.

क्लिक करा - रस्त्यावरील झाडांच्या खोडाला का असतो पांढरा-लाल रंग? जाणून घ्या यामागचं महत्वाचं कारण

पोलिसांना मिळाली बनावट पिस्टल

गोदणी मार्गावरील बायपासजवळ कमांडो ड्रेसमध्ये असलेल्या एका तरुणाकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या पिस्टलची पाहणी केली असता, बनावट निघाले. सदर तरुण नागपूर येथील असून, आयुर्वेदिक औषध विक्रीसाठी शहरात आला होता. त्याला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्तलिहेस्तोवर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief stole service revolver of API in yavatmal