भाविकांचा भ्रमनिरास : प्रथमच हारफूल, प्रसादाशिवाय होणार गणेशाची पूजा; तिळी चतुर्थीसाठी नवे नियम

मंगेश गोमासे
Thursday, 28 January 2021

भाविकांना कुठल्याच प्रकारचे साहित्य सोबत आणता येणार नाही. ज्यांनी पूजेचे साहित्य आणले त्यांचे साहित्य प्रवेशद्वाराजवळ गोळा करण्यात येणार आहे. लहान मुलांना मंदिरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी (ता. ३१) तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हारफूल आणि प्रसाद आणण्यास मंदिर समितीने मनाई केली आहे. त्यामुळे भाविकांना केवळ टेकडी गणेशाचे दर्शन घेऊन नमस्कार करता येणार आहे. याशिवाय मास्क घातल्याशिवाय कोणत्याही भाविकाला दर्शन करता येणार नसल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विकास लिमये यांनी दिली.

तिळी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश टेकडी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक गर्दी करीत असतात. दरवर्षी हजारो भाविक मंदिरात येतात. त्यामुळे याही वर्षी पौष तिळी चतुर्थीला मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टच्या वतीने सामाजिक अंतर पाळून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहनांची पार्किंग मानस चौकातील माहेश्वरी भवनाच्या परिसरात करण्यात येणार आहे.

जाणून घ्या - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

भाविकांना कुठल्याच प्रकारचे साहित्य सोबत आणता येणार नाही. ज्यांनी पूजेचे साहित्य आणले त्यांचे साहित्य प्रवेशद्वाराजवळ गोळा करण्यात येणार आहे. लहान मुलांना मंदिरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय येताना मास्क आणि सॅनिटायझर सोबत आणण्यास सांगण्यात आले आहे. जे नागरिक मंदिरात मास्कशिवाय येतील त्यांना मंदिर व्यवस्थापनाकडून मास्क देण्यात येईल असे मंदिर ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.

तिळी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. सकाळी ४ वाजता मंगल आरती करण्यात येईल. भाविकांसाठी ५०० किलो रेवडीचा प्रसार ठेवण्यात आला आहे. याशिवाय सायंकाळी ४ वाजता विकास मालू तर ५ वाजता हल्दीरामचे व्यवस्थापकीय संचालक शिवकिसन अग्रवाल यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे.

अधिक वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

अशी असेल व्यवस्था

पार्किंग माहेश्वरी सभागृहाच्या बाजूला असलेल्या मैदानात राहणार आहे. महादेव मंदिर परिसरात चप्पल व जोडे स्टॅण्ड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी पार्किंगच्या जागेपासून ई-रिक्क्षाची सोय, मुख्य प्रवेशद्वारापासून महिला आणि पुरुष असे दोन स्वतंत्र मार्ग, दर्शनादरम्यान मधे कुठेही थांबता येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Tili Chaturthi, worship of Lord Ganesha will be done without prasada