एकूण पाच कोटी रुपयांच्या माशांचा पाण्यातच झाला तडफडून मृत्यू, काय घडले असे...

सतिश घारड
Wednesday, 2 September 2020

साधारणतः माशांना जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्‍कता असते. परंतू माशांसाठी जीवनदाते असलेले पाणीच माशांच्या मरणाचे कारण ठरत असेल तर...! 

टेकाडी(जि.नागपूर):  साधारणतः माशांना जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्‍कता असते. परंतू माशांसाठी जीवनदाते असलेले पाणीच माशांच्या मरणाचे कारण ठरत असेल तर...!  संततधार पावसाने पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयासह तोतलाडोह धरण पाण्याने लबालब झाले होते. अशात धोक्याची घटका बघता तोतलाडोह धरणांचे चौदा तर पेंच जलाशयाची सोळा दारे सहा मीटरपर्यंत उघडी करून पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला. धरणाच्या पुरामुळे जिथे संपूर्ण जिल्हयात थैमान घातलेले असताना पेंच जलाशयात पिंजरा पद्धतीतील हजारो मासोळ्या मृत पावल्या असून धरणातील पिंजरा पद्धतीतील माशे वाहून गेल्याने अधिकृतरित्या मत्ससंवर्धन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. अशात शासनाने व्यापाऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.

अधिक वाचाः‘सालई, माहुली’ला जलसमाधी, नयाकुंड मात्र जुना असूनही साबूत, काय भानगड आहे, वाचा...

उत्पन्न येण्याच्या वेळेलाच निसर्गाची अवकृपा
मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन आणि संवर्धन यामुळे मत्स्य उत्पादनात मोठी वाढ व्हावी, सोबत मोठ्या स्वरूपात रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तलाव, धरण यासारख्या ठिकाणी पिंजरा पद्धतीने मत्ससंवर्धन
करण्याची संध्या उपलब्ध करून दिली. परंतू व्यवसाय उभा करून उत्पन्न येण्याच्या वेळेलाच निसर्गाची अवकृपा होत असल्याने संबंधित व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकसानामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पीडित व्यापारी सुरेश पांडुरंग हूड, विशेष वसंता फुटाणे, सुकेशनी अनुप गजभिये, योगेश बालकदास गजभिये, रामदयाल जंगलू पाटील, राहुल भीमराव गजभिये, ज्योती राजेश बन्सोड या सात जणांना पेंच जलाशयात महाराष्ट्र्र शासन मत्सविभाग राष्ट्रीय मतस्यीकी विकास बोर्ड हैद्राबाद केंद्र पुरस्कृत निलक्रांती योजने अंतर्गत ‘पिंजरा’ पद्धतीने मत्ससंवर्धन" वर्ष २०१९ ते २०२५ पर्यंत करण्याचे कंत्राट महाराष्ट्र्र शासनाने अधिकृतरित्या दिले.

अधिक वाचाः आधीच आर्थिक अडचण असताना सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच

शासनाने तात्काळ मदत करावी !
सातही व्यापाऱ्यांना पेंच जलाशयात प्रति व्यक्ती क्षेत्रफळ जलक्षेत्र ०.१५ हेक्टर या पद्धतीने केजेस टाकण्याची मुभा आहे. प्रत्येकाने आपआपल्या पिंजऱ्यामध्ये ‘पंकस’ प्रजातीच्या माश्याचे संवर्धन करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांनी मासे मोठे होऊन हातात उत्पन्न येण्यास सुरवात देखील होणार होती. परंतू सतत होत असलेल्या पावसामुळे २८ ऑगस्ट रोजी तोतलडोह तुडूंब भरला आणि धरणाची चौदा दारे उघडून पाण्याचा विसर्ग  पेंच, नवेगाव खैरी जलाशयात करण्यात आला. पेंच जलाशयाची पातळी ओलांडल्याने सहा मीटर पाण्याचा प्रवाहात पेंच जलाशयाची सोळा दारे उघडल्या गेली. ज्या प्रवाहात मत्ससंवर्धकांचे होत नव्हते सारे वाहून गेले. जीवावर उदार होऊन हाती लागेल तो माल वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांच्या हाती निराशा आली. धरणाची दारे बंद झाल्यानंतर टाक्यांची पाहणी केली असता हजारोंच्या वर मासोळ्यांचा  खच पडलेला होता. एकंदरीत सातही व्यापाऱ्यांना प्रत्येकी ७२ लाख अशाप्रकारे एकूण पाच कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सुरेश हूड या व्यापाऱ्याने दिली.२०१८ मध्ये देखील याच पद्धतीचा आर्थिक भूर्दंड त्यांना सोसावा लागला. ज्याचा मोबदला अद्यापही मिळालेला नसून यंदा झालेल्या नुकसानीची भरपाई तरी शासनाने तात्काळ द्यावी, अन्यथा आर्थिक झळ व्यापारी वर्गांवर येणार असल्याची मागणी सातही व्यापाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचाः  पूरग्रस्त भागाचे पंचनामे नंतर करत बसा, आधी तत्काळ मदत द्या, कोण म्हणाले असे...

अशी असते पिंजरा पद्धत
मत्स्य उत्पादकांना शासनाच्या नियमानुसार लिजवर ठराविक जागा दिली जाते. एका बॉक्समध्ये मत्स्य बिज टाकले जाते.  तो बॉक्स त्या ठरलेल्या जागेत  पाण्यात ठेवला जातो. त्यात माशांचे  संवर्धन केले जाते. मासे विकण्यायोग्य झाल्यानंतर ते काढून बाजारात  विक्रीसाठी आणले जातात. पेंचला आलेल्या महापुरामुळे पिंजऱ्यातील माशांचा मृत्यू झाला. त्यात सुमारे पाच कोटी रुपयांचे  नुकसान झाल्यामुळे  मत्स उत्पादकांना जबर फटका बसला आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A total of five crore rupees worth of fish died in the water,