आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध मनपा पदाधिकारी, सदस्य असा सामना रंगणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

आतापर्यंत ज्या प्रश्‍नांच्या उत्तरापासून आयुक्त पळ काढत होते त्याची उत्तरे देण्यासाठी आयुक्तांनी आता तयार राहावे.

नागपूर : राज्य सरकारने महापालिकेची सभा घेण्याची स्पष्ट सूचना केली असून आता सभेपासून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरासाठी तयार राहावे, असे आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

या सभेत सत्ताधाऱ्यांकडून आयुक्तांवर अविश्‍वास ठराव आणण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. मात्र, विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मागणी केल्यास जनहिताच्या मुद्द्यावर अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्‍यता सत्तापक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या महापालिका सभेत आयुक्ताविरुद्ध पदाधिकारी, सदस्य असा सामना रंगणार अशी चिन्हे दिसत आहेत. 

महापौरांचे उद्या 20 जून रोजीच्या प्रस्तावित सभेबाबतचे पत्र आयुक्तांनी राज्य शासनाकडे अभिप्रायासाठी पाठविले. त्यावर आज राज्य सरकारने अभिप्राय दिला असून कोविडबाबतच्या नियमांचे पालन करून सभा घेण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले, अशी माहिती देतानाच आयुक्तांचे वर्तन लोकशाहीविरुद्ध असल्याचा घणाघात सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी केला.

राज्य सरकारने दिलेल्या अभिप्रायाने लोकप्रतिनिधींचा विजय झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तर राज्य सरकारने सभेसाठी परवानगी दिल्यानंतर आयुक्त लोकप्रतिनिधींना त्रास देण्यासाठीच कामे करीत असल्याचे स्पष्ट झाले, असा टोला ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी लगावला. गेल्या तीन महिन्यांतील आयुक्तांची कार्यप्रणाली नियमबाह्य होती, असा आरोप करीत तिवारी यांनी केला.

आपले पितळ उघडे पडण्याच्या भीतीने सभागृहच होऊ द्यायची नाही, अशी आयुक्तांची भूमिका होती. लोकप्रतिनिधीच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी आयुक्तांची कृती आहे. लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याची नियोजनबद्ध पद्धत ते अवलंबवित आहे, असेही तिवारी म्हणाले. आतापर्यंत ज्या प्रश्‍नांच्या उत्तरापासून आयुक्त पळ काढत होते त्याची उत्तरे देण्यासाठी आयुक्तांनी आता तयार राहावे, असे आव्हान त्यांनी दिले.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या राजकीय "गॉडफादर'चा आधार घेऊन शहराचे नुकसान करीत आहे, असा घणाघातही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होते. 

आयुक्तांच्या उत्तराने सारेच अवाक्‌ 
16 जूनला महापौर संदीप जोशी यांनी गटनेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सभेबाबत आयुक्तांना पत्र दिले. परंतु, दोन दिवस त्यांनी उत्तर दिले नाही. अखेर आज महापौरांच्या "मेल'वर त्यांनी उत्तर पाठविले. "सभेचा निर्णय तुम्ही घेतला, त्यामुळे तुम्हीच व्यवस्था करा' असा मेल आयुक्तांनी महापौरांना केल्याबाबत तिवारी यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Mundhe will be target in nmc meeting